07 September, 2021

 

घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्याचे वितरण करावे

                            --- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


 

हिंगोली (जिमाका), दि. 07 : सध्या शाळा सुरु नसल्यामुळे जंतनाशक गोळ्याचे वितरण आशा, अंगणवाडी, तसेच आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रत्येक घरी भेटी देऊन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी परशुराम पावसे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय जंतनाशक दिन दि. 21 सप्टेंबर, 2021 रोजी साजरा करण्यात येत आहे. या दिनांचा आढावा घेताना मुलांचे आरोग्य, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी बालकांना घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्याचे वितरण करावे. तसेच प्रत्येक शाळेत, सार्वजनिक ठिकाणी हात धुण्याची मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी केल्या.

यावेळी जिल्हा‍ आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जंतनाशक गोळ्याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगात 28 टक्के बालकांना जंत दोष असतो. 68 टक्के बालकामध्ये आतड्याचा जंत दोष मातीतून प्रसार होणाऱ्या जंतुमुळे होतो. त्यामुळे 01 ते 19 वर्ष या वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगून ही मोहीम आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, शिक्षण विभाग, नागरी विकास, महिला व बालविकास विभाग, पंचायत राज विभाग, जंतनाश करण्याचा जागतिक उपक्रम व पार्टनर्स यांचा सहभाग असणार असल्याची माहिती दिली.

 

*****

No comments: