20 September, 2021

 

ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांनी

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

 

हिंगोली, (जिमाका) दि. 20 : राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियान अंतर्गत (एन एम एटी) बियाणे व  लागवड साहित्य उपअभियान कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगाम 2021-22 मध्ये फार्म सेव्हड् सिड वृध्दीगत करुन शेतकरी स्तरावर बियाणे बदल दरात वाढ करण्याच्या उद्देशाने या उपअभियानांतर्गत हरभरा व गहु या पिकासाठी ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम कृषि विभाग व महाबिज यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यास हरभरा पिकासाठी 4300 क्विंटल व गहु पिकासाठी 350 क्विंटल चे लक्षांक प्राप्त आहे. ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत प्रती शेतकरी 01 एकरच्या मर्यादेत लाभ मिळणार असून हरभरा पिकासाठी 10 वर्षाच्या आतील (जात- फुले विक्रम, राजविजय-202, AKG-1109, फुले विक्रम) बियाण्यासाठी 25 रुपये प्रती किलो अनुदान देय आहे व 10 वर्षावरील (जात-जॅकी-9218, दीग्वीजय, विजय, विशाल, विराट) बियाण्यासाठी 12 रुपये प्रति किलो अनुदान देय आहे. तसेच गहु पिकासाठी 10 वर्षाच्या आतील (जात- फुले समाधान, NPAW-1415) बियाण्यासाठी 20 रुपये प्रती किलो अनुदान देय आहे व 10 वर्षावरील (जात-MACs-6222, HI-1544, GW-496, लोकवन) बियाण्यासाठी 10 रुपये प्रति किलो अनुदान देय आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आनिवार्य आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी नजीकच्या सामुहिक सेवा केंद्राच्या ठिकाणी जाऊन किंवा ज्या शेतकऱ्यांकडे android स्मार्ट मोबाईल आहे त्यांनी गुगल प्लेस्टोअरवर जाऊन MahaDBT Farmer हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करुन घ्यावे. या सुविधा वापरकर्ता आयडी व आधार क्रमांक आधारित असल्याने एकाच गावातून स्मार्ट मोबाईल असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यास अनेक शेतकरी अर्ज करु शकतील. अर्ज स्वीकारण्याची  शेवटची तारीख 25 सप्टेबर 2021 आहे.

ग्रामबिजोत्पादन योजनेत जिल्ह्यातील गांवातील शेतकऱ्यांनी 25 सप्टेबर 2021 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत. अधिक  माहितीसाठी संबधित तालुका कृषि अधिकारी किंवा आपल्या गावातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा, असे अवाहन बळीराम कच्छवे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.                                       

*******

No comments: