08 March, 2022

 



जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये

तंबाखूमुक्त करावेत

                                                        --- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

 

हिंगोली, दि. 08 (जिमाका) :  जिल्ह्यातील सर्व  शासकीय, निमशासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करावेत. यासाठी सर्व कार्यालयाच्या ठिकाणी फलक लावावे. यासाठी संबंधित यंत्रणेनी  पाठपुरावा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.पापळकर बोलत होते. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, डी. एस. चौधरी, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे अभिजीत संघई , डॉ. फैसल खान, डॉ. माधवी घट्टे, डॉ. स्वाती डाखूरे, कुलदीप केळकर, आनंद साळवे, भाऊसाहेब पाईकराव  उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, शिक्षण विभागांनी आपल्या शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी काम करावे. पोलीस व नगर परिषद यांनी समन्वयाने शालेय परिसरातील सर्व पान टपऱ्या उठविण्याची कार्यवाही करावी. तसेच सर्व कार्यालयानी आपल्या कार्यालयात धुम्रपान कायद्याचे उल्लंघन  करण्याऱ्यांकडून दोनशे रुपये दंड वसूल करावा. तसेच दंत महाविद्यालय येथे तंबाखू मुक्ती केंद्र स्थापन करण्यात यावेत. कोटपा कायद्यानुसार शालेय परिसरात शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी असतानाही शालेय परिसरात पानटपऱ्या दिसतात. याबाबत पोलीस व नगर परिषदेने संयुक्तरित्या कार्यवाही करावी.

तसेच आरोग्य व शिक्षण विभागांनी पिट ॲन्ड फिशरी मोहिम राबवून जिल्ह्यातील सर्व शाळातील विद्यार्थ्यांची माहिती  तयार करुन त्यांच्या दाताची तपासणी व दात स्वच्छ करण्यासाठी  कार्यक्रम तयार करावा आणि पुढील आठवड्यापासून या मोहिमेस सुरुवात करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिले.  

यावेळी बैठकीस पोलीस, शिक्षण, कृषी, नगर परिषद, पंचायत समिती, अन्न व औषध प्रशासन, वस्तु व सेवा कर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह डॉ.हेडगेवार दंत महाविद्यालय, आदर्श महाविद्यालय व शिवाजी महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

****

No comments: