24 March, 2022

 

परभणी येथे उती व पाने तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित

शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : मराठवाडा विकास मंडळाच्या 2020-21 अंतर्गतच्या विशेष निधीतून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, परभणी यांच्या अधिनस्त जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, परभणी यांच्या प्रयोग शाळेत उती व पाने तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. या प्रयोगशाळेत उती व पाने परिक्षणांतून पिकांच्या वाढीच्या अवस्थेमध्ये सर्व अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेचे प्रमाणपत्र काढण्यात येते. जेणेकरुन ज्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे ते अन्नद्रव्य रासायनिक खताद्वारे पानावर फवारणी करुन किंवा विद्राव्य खताद्वारे सिंचनातून देणे शक्य होते. ज्यामुळे रासायनिक खताचा कार्यक्षम व समतोल वापर करुन उत्पादन खर्चात बचत करणे तथा उत्पादकता वृध्दी, उत्पादनाची गुणवत्ता वाढवणे साध्य होते.

या प्रयोगशाळेत उती व पाने नमुन्यांची तपासणी करुन पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या नत्र, स्फूरद, पालाश, लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरॉन, गंधक, कॅलशियम, मॅग्नेशियम या 11 अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेचे प्रमाण काढले जाते. यासाठी प्रती नमुना तपासणी शुल्क 1100 रुपये आकारले जातात.

उती व पाने परिक्षणासाठी नमुना घेताना चारही दिशेने तथा सूर्यप्रकाशात असलेल्या पानांचाच समावेश असावा. माती लागलेल्या , कीडग्रस्त, रोगग्रस्त तथा ओलाव्याचा अभाव असलेल्या पानाचा नमुना घेण्यात येऊ नये. नमुना काढल्यानंतर स्वच्छ कागदी किंवा कापडी पिशवीमध्ये 12 तासाच्या आत प्रयोगशाळेत तपासणीसाठी आणावा. निर्यातक्षम भाजीपाला, फळपिके, फूलपिके तसेच हरितगृह व पॉली हाऊसमध्ये उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी विशेष करुन उती व पाने नमुने तपासणी करणे गरजेचे आहे.

नमुना घेताना कांही अडचण आल्यास ग्रामपातळीवरील संबंधित कृषि सहायक किंवा उती व पाने तपासणी प्रयोगशाळा द्वारा जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी परभणी यांचे कार्यालय, जानकी बिल्डींग, योगक्षेम कॉलनी, विसावा फाटा, जिंतूर रोड, परभणी-431401 यांच्याशी संपर्क साधून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*****

No comments: