25 March, 2022

 



नेहरु युवा केंद्राच्या वतीने पुरस्काराचे वितरण

राष्ट्र आणि समाज बळकट करण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रमांत युवकांनी सहभागी व्हावे

                                                               - जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत

               

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : केंद्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभाग अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र अंतर्गत आयोजित राष्ट्रीय, सामाजिक आणि युवक कल्याणाच्या सर्व कार्यक्रमात सर्व युवकांनी सहभागी होऊन राष्ट्र आणि समाज अधिक बळकट करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांनी केले.

हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा युवा संमेलन 2021-22 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉ.संतोष कल्याणकर हे होते. तर प्रमुख अतिथी माहिती सहायक चंद्रकांत कारभारी, प्रमुख व्याख्याता म्हणून 1993 सालचे नेहरु युवा केंद्राचे पुरस्कारार्थी ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार, योगाध्यापक रत्नाकर महाजन, संगणक तज्ञ संदीप कांबळे, चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. विजय निलावार यांनी तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार यांनी म्हणीप्रमाणे नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून सामाजिक व राष्ट्रीय कार्यात स्वत: ची ओळख निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच रत्नाकर महाजन आणि संदीप कांबळे यांनी या प्रसंगी युवकांना संबोधित करताना युवक शक्ती ही देशाची मोठी शक्ती असून ह्या शक्तीचा उपयोग करुन घेण्यासाठी युवकांनी सर्वार्थानं बलशाली होऊन समाज आणि देशाप्रती प्रयत्नरत राहावं अशा आशयाचे उदगार काढले. अध्यक्षीय समारोपात आजचा युवक हा उद्याचा सक्षम नागरिक बनला पाहिजे. यासाठी नेहरु युवा केंद्रासारखे संघटन हे दिशादर्शक असल्याचे डॉ. संतोष कल्याणकर यांनी  सांगितले.

यावेळी नेहरु युवा सांस्कृतिक क्रीडा मंडळ, खरबी ता.हिंगोली या संस्थेचे नामदेव सपाटे यांचा 25 हजार रुपयाचा पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार आला. तर अन्य  युवा मंडळांना क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये बोराळवाडीच्या राजश्री शाहू महाराज सेवाभावी संस्था, लासीनाच्या बहुउद्देशीय संस्था, राहोलीच्या नेहरु युवा मंडळासह अन्य लाभार्थी संस्थांचा समावेश आहे. याप्रसंगी पत्रकार विजय गुंडेकर, पत्रकार पल्लवी मगदूम यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रवीण पांडे यांनी केले.

या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक युवा, युवती  सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रविण पांडे, संदीप शिंदे, नामदेव फरकंडे, अजय धोतरे, निळकंठ कुंभारे, सुदर्शन राठोड, सोपान सोनटक्के,अनिल बिनगे, बाळू नागरे यांनी परिश्रम घेतले.

*****

No comments: