06 April, 2023

 

माजी सैनिकांनी पदवी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी

अर्ज करण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 06 : केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठ यांच्या कला शाखेतून बीए (एचआरएम) पदवी प्रमाणपत्र प्राप्त करुन देण्यासाठी करार झालेला आहे. हे पदवी प्रमाणपत्र केंद्र व राज्य सरकार तसेच इतर सार्वजनिक उपक्रमाच्या नोकरीसाठी मान्यताप्राप्त आहे. देशाच्या रक्षणासाठी आपल्या तरुणाईच्या आयुष्याचा मोठा भाग समर्पित करणाऱ्या सैनिकांना नोकरीसाठी शैक्षणिक क्षेत्रात सशक्त बनविणे हा उद्देश आहे.

            माजी सैनिकास निवृत्तीच्या वेळी प्राप्त झालेले शैक्षणिक प्रमाणपत्र काही संस्था मान्य करत नाहीत. त्यामुळे आंध्र विद्यापीठाशी झालेल्या कराराद्वारे माजी सैनिकास विविध नोकऱ्यांसाठी पात्र होण्यासाठी तसेच सक्षम करण्यासाठी आंध्र विद्यापिठाद्वारे कला शाखेतून बीए (एचआरएम) पदवी प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

            माजी सैनिकांसाठी कला शाखेतून पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्रता व अटी : अर्जदार माजी सैनिक असावा. अर्जदाराचे शिक्षण इयत्ता बारावी किंवा समतूल्य शिक्षण किंवा भारतीय आर्मी, नेव्ही, एअरफोर्स द्वारा प्राप्त शिक्षणाचे विशेष प्रमाणपत्र, माजी सैनिकांची सेवा पंधरा वर्षापेक्षा कमी नसावी. दि. 01 जानेवारी, 2010 नंतर निवृत्त झालेला असावा. माजी सैनिक इयत्ता दहावी पास असेल तर अशा उमेदवारांना 5 वर्षाचा अभ्यासक्रम (2 वर्ष 12 वी + 3 वर्ष पदवी) लागू राहील. सदर अभ्यासक्रमाची कोर्स फी 12 हजार 500 रुपये असून अर्जदाराने आपले अर्ज फक्त एप्रिल किंवा ऑक्टोबर महिन्यातच संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी www.ksb.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन Circulars/Publications पहावे किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास भेट द्यावी.

            इच्छूक माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे‍.

******

No comments: