29 August, 2016

अवयवदान जागृती प्रभावी परिणामकारक होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत
--- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
हिंगोली, दि. 29 :- अवयवदान जनजागृती करण्याबाबत महाअभियान सन -2016 दिनांक 30 ऑगस्ट, 2016 ते दिनांक 1 सप्टेंबर, 2016 दरम्यान जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जनतेतून अवयव दानाला चालना मिळवी याकरिता राज्यस्तरावर कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे.  
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी , नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती अनिता सुर्यतळ, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, समाजसेवक धरमचंद बडेरा आदि सदस्य तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.  
अवयवदान महाअभियानामध्ये वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग व उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत महाअवयवदान जागृतीबाबत महसूल विभाग, गृह विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या सहकार्याने व समन्वयाने विविध उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी मागर्दर्शक सुचना केल्या.  
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांनी अवयवदान जनजागृती करण्याबाबत महाअभियान सन -2016 दिनांक 30 ऑगस्ट, 2016 ते दिनांक 1 सप्टेंबर, 2016 दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दिनांक 30 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी 8-00 वाजता प्रभातफेरी (वॉकेथॉन कार्यक्रम) जिल्हा रुग्णालय हिंगोली येथून हिरवी झेंडी दाखवून प्रभातफेरीची सुरुवात करण्याचा मानस असून सदर प्रभातफेरी तहसील कार्यालयासमोरुन -शासकीय विश्रामगृह चौक-भारतीय विद्या मंदिर - जवाहर रोड मार्गे- गांधी चौक येथे पोहचेल . प्रभातफेरीमध्ये जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी आणि महाविद्यालयीन युवक-युवती यांचा सहभाग असणार आहे. गांधी चौकामध्ये उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन व अवयवदान करण्याबाबत जनतेस आवाहन करुन प्रभात फेरीचे विसर्जन करण्यात येणार आहे. गांधी चौकामध्ये अवयव दान करणाऱ्या इच्छूक लोकांकरिता अवयवदान नोंदणी केंद्राचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.        
प्रसिध्दी (आयईसी) साहित्य वितरण :- प्रभातफेरी दरम्यान व गांधी चौक, हिंगोली येथे अवयवदानासंबंधी जनगृतीपर मार्गदर्शन / माहिती पत्रकाचे वितरणही करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. दिनांक 31 ऑगस्ट, 2016 रोजी अवयवदान जनजागृतीबाबत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. हिंगोली शहरातील महाविद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेल्या आहेत. तसेच गांधी चौकामध्ये अवयवदान नोंदणी कक्ष स्थापन करुन सकाळी 10.00 ते सायंकाळी 5-00 वाजेपर्यंत इच्छूक अवयवदान दात्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील महाविद्यालयात युवक-युवतींना अवयवदानासंबंधी मार्गदर्शन व व्याख्यानाचेही आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक 31 ऑगस्ट, 2016 रोजी जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. अवयवदान नोंदणी कक्ष स्थापन करण्यात येवून अवयवदान दात्यांची नोंदणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांनी माहिती दिली.
*****

                                                          

No comments: