19 December, 2019



दिव्यांगांना मोफत साहित्य वाटपासाठी तपासणी शिबीराचे आयोजन
·        पुर्वतयारी बैठक संपन्न  
            हिंगोली,दि.19: सामाजिक न्याय एवम अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार यांच्या एडीप (ADIP)  या योजनेंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ॲलिम्को) कानपूर, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र हिंगोली व गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव व साह्यभूत साधने वाटप करण्यासाठी पहिल्या टप्यामध्ये तालुका निहाय तपासणी व मोजमाप शिबीराचे आयोजन करण्यासाठीची पुर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जगदिश मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .
            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीवास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल) गणेश वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार, शिक्षणाधिकारी संदिपकुमार सोनटक्के, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, भारतीय कृत्रीम अंग निर्माण निगम (ॲलिम्को) कानपूरचे विभागीय अधिकारी संजय मंडल, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे जिल्हा समन्वयक विष्णू वैरागड, दिलीप बांगर, शेषरावजी कावरखे यांच्यासह दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी  यांची प्रमुख उपस्थिती होती.
             यावेळी  जिल्हाधिकारी  जगदिश मिनियार यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात या शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून ग्रामीण रुग्णालय सेनगांव येथे दिनांक 29 डिसेंबर 2019 रोजी, उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी येथे दिनाक 30 डिसेंबर 2019 रोजी, उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे दिनांक 31 डिसेंबर 2019 रोजी, नागनाथ महाविद्यालय, औंढा नागनाथ येथे दिनांक 01 जानेवारी 2020 रोजी तर जिल्हा सामान्य रुग्णालय येथील अधिपरिचारीका महाविद्यालयातील सभागृहात हिंगोली येथे दिनांक 02 जानेवारी 2020 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            जिल्हाधिकारी श्री. मिनियार यावेळी म्हणाले की, सर्व वयोगटातील सर्व प्रवर्गातील दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. या शिबिरात तीन चाकी सायकल, मोटाराईज ट्रायसायकल  व्हिलचेअर, कुबडी, सर्व प्रकारच्या काठ्या, अंधांना ब्रेल किट, वय वर्ष 14 ते 26 या वयोगटातील महाविद्यालयीन अंध युवकांसाठी स्मार्ट केन, स्मार्ट फोन, कर्नबधीर दिव्यांगांना डिजीटल श्रवणयंत्र आणि मतिमंद वय वर्ष 05 ते 18 वयोगटातील दिव्यांगांना एम.आर. कीट व गरज असल्यास व्हिलचेअर इत्यादी साहित्य वाटपासाठी तालुका निहाय मोजमाप व तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
            या शिबीराचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र प्रत, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला किंवा राशन कार्ड व एक पासपोर्ट आकाराचा फोटो हे आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. बैठकीचे प्रास्ताविक  जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे जिल्हा समन्वयक विष्णू वैरागड यांनी केले.  यावेळी संबंधीत विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

*****

No comments: