27 July, 2017

भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन

हिंगोली, दि. 27 : भारतीय डाक विभागामार्फत महात्मा गांधी जयंतीचे निमित्त साधून या वर्षी ढाई आखर अखिल भारतीय पत्र लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेसाठीचा विषय हा प्रिय बापू (महात्मा गांधी) तुम्ही मला प्रेरित करीत आहात Dear Bapu (Mahatma Gandhi) you inspire me.. असा आहे. पत्र इंग्रजी, हिंदी, स्थानिक भाषेतून मुख्य पोस्ट मास्टर जनरल, मुंबई महाराष्ट्र यांना दि. 15 ऑगस्ट, 2017 रोजीपर्यंत मिळतील, अशा पध्दतीने पाठवायचे आहे.
पत्र ए-4 आकाराच्या कागदावर लिहू शकतात. ते 1 हजार शब्दांपेक्षा जास्त नसावे. तसेच इनलॅण्ड लेटर कार्ड (Inland letter card) वरही हे पत्र लिहू शकतात. त्यासाठी शब्द मर्यादा 500 एवढी आहे. इम्बॉस इनव्हलप आणि Inland letter card हेच वापरण्यासाठी परवानगी असेल. ही स्पर्धा सर्वांसाठी असेल. तसेच वयोमर्यादेचे कुठलेही बंधन नाही. ज्या व्यक्तीने पत्र लिहले असेल त्यांनी स्वत: नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खास या पत्रलेखनासाठी तयार करण्यात आलेल्या पत्रपेटीत टाकावे किंवा संबंधित पोस्टमास्तर यांच्याकडे सोपवावे.
पत्रलेखन स्पर्धेसाठी पुढीलप्रमाणे श्रेणी असतील. त्यात अ) वय वर्षे 18 पर्यंत 1) Inland letter card, 2) Envelope. ब) 18 वर्षांवरील 1) Inland letter card, 2) Envelope. प्रत्येक पोस्टल सर्कलमधून प्रत्येक श्रेणीचे 3 सर्वोत्कृष्ट पत्र निवडले जातील आणि डाक निदेश कार्यालय, नवी दिल्ली यांना पाठविण्यात येतील. यापैकी प्रत्येक श्रेणीतून 3 सर्वोत्कृष्ट पत्र निवडले जातील आणि साबरमती आश्रमात पाठविण्यात येतील. निवड झालेल्या सर्वोत्कृष्ट पत्र लेखकांना 2 ऑक्टोबर, 2017 रोजी साबरमती आश्रम येथे सन्मानित करण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या लेखकांना मान म्हणून पोस्टाचे आश्रयदाता ही पदवी देण्यात येईल. तसेच बक्षिसपात्र पत्रे मुख्य वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित करण्यात येतील.
राष्ट्रीय स्तरावरील बक्षिसांची रक्कम ही पुढीलप्रमाणे अ) प्रत्येक श्रेणीमधील प्रथम पारितोषिक आणि रु. 50 हजार (पोस्टाचे आश्रयदाता), ब) प्रत्येक श्रेणीमधील द्वितीय पारितोषिक आणि रु. 25 हजार (पोस्टाचे सोबती), क) प्रत्येक श्रेणीमधील तृतीय पारितोषिक आणि रु. 10 हजार पोस्टाचे मित्र). प्रत्येक सर्कल (राज्य) स्तरावरील बक्षिसाची रक्कम ही पुढील आहे. अ) प्रत्येक श्रेणीमधील प्रथम पारितोषिक आणि रु. 25 हजार, ब) प्रत्येक श्रेणीमधील द्वितीय पारितोषिक रु. 10 हजार आणि क) प्रत्येक श्रेणीमधील तृतीय पारितोषिक रु. 5 हजार. तरी सर्व इच्छूक नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे तसेच सविस्तर माहितीकरिता जवळील डाकघरशी संपर्क साधावा किंवा www.indiapost.gov.in वर लॉग ऑन करण्याचे आवाहन परभणी विभागाचे डाकघर अधीक्षक मनोहर पत्तार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

No comments: