11 July, 2017

60 दिवसात 10 हजार 521 वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण

हिंगोली, दि. 10 : स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत सन 2017-18 च्या वार्षिक कृती आराखड्यानुसार वैयक्तिक शौचालयाचे बांधकामाचे एकूण उद्दिष्ट 89 हजार 663 एवढे आहे. त्यापैकी 60 दिवसात 10 हजार 521 एवढे प्राप्त उद्दिष्ट पुर्ण झाले आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय औंढा नागनाथ -2 हजार 753, वसमत- 2 हजार 888, कळमनुरी - 1 हजार 964, सेनगांव - 1 हजार 162 असे एकूण 10 हजार 521 वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण झाली आहेत.
जिल्ह्यात हागणदारी मुक्त एकूण 158 ग्रामपंचायती झाल्या असून जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम औंढा नागनाथ व वसमत ह्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाले आहे. सर्वात कमी प्रमाणात सेनगांव व कळमनुरी ह्या तालुक्यामध्ये वैयक्तिक शौचालयाचे उद्दिष्ट पुर्ण झाले आहे. सदर उद्दिष्ट पुर्ण करण्याकरिता वेगवेगळ्या नाविण्यपुर्ण उपक्रमाव्दारे जनजागृती करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने औंढा नागनाथ येथे रॅपिट ओडिईपी यशस्वीरित्या नियोजन करून संपुर्ण तालुक्यामध्ये राबविण्यात आले आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये बेस लाईन यादी वाचन, ग्रामसभा, स्वच्छता फेरी, मशाल फेरी ह्या उपक्रमाव्दारे राबविण्यात आली. वसमत तालुक्यामध्ये 200 तासात 20 हजार शौचालय हा नाविण्यपुर्ण उपक्रम राबविण्यात आला. तसेच गावपातळीवर वैयक्तिक शौचालयासाठी तांत्रिक मार्गदर्शन, शौचालय साहित्याची जुळवाजुळव, योग्य नियोजनाव्दारे गावातील ग्रामस्थाना स्वच्छतेचे महत्व वैयक्तिक शौचालय, हागणदारी मुक्त गावाचे महत्व पटवून देण्यात आले. त्यामुळे बांधकामास मोठ्या प्रमाणात गती प्राप्त झाली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांच्या योग्य नियोजनाव्दारे जिल्ह्यामध्ये वैयक्तिक शौचालय बांधकामास गती प्राप्त झाली आहे.

*****

No comments: