01 July, 2017

कृषि क्षेत्रातील वसंतराव नाईक यांचे योगदान अमुल्य
--- पालकमंत्री दिलीप कांबळे

हिंगोली,दि.1: माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक हे दूरदृष्टी असलेले नेते होते. वसंतराव नाईक यांनी कोणताही स्वार्थ बाळगता शेती आणि शेतकऱ्यांसाठी दिलेल्या अमुल्य योगदानामुळे त्यांचे नाव राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आदराने घेतले जाते. त्यांनी कृषी विकासाकरीता केलेल्या महान कार्यामुळेच त्यांचा स्मृती दिन हा कृषि दिन म्हणून साजरा करण्यात येतो असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
जिल्हा परिषद येथील षटकोणी सभागृहात कृषि दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री दिलीप कांबळे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकूळे, आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, नगर परिषदेच्या नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिपचे कृषि सभापती प्रल्हादराव राखोंडे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एम.देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, आत्माचे प्रकल्प संचालक बी.पी. लोंढे आणि कृषी विकास अधिकारी श्री. डूबल यांची प्रमुख उपस्थिती होती.  
यावेळी पालकमंत्री कांबळे म्हणाले की, राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा निर्णय असून त्यामुळे राज्यातील सुमारे 89 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कर्जमाफी मुळे सुमारे 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असून जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत त्यांच्या बँक खात्यात 25 टक्के प्रोत्साहनपर अनुदान जमा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा मिळला आहे.
राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, शेतकरी बांधवांना सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेती आणि शेतकरी बांधवासाठी राज्य शासनाने अनेक कल्याणकारी निर्णय देखील घेतले आहे. यात शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी पिक क्षेत्रनिहाय कृषि प्रक्रिया उद्योगाची उभारणी, कृषी प्रक्रिया उद्योगासाठी 25 टक्के किंवा रुपये 50 


लाखापर्यंत अनुदान, हळद प्रक्रिया उद्योगासाठी रुपये 50 लाखापर्यंतची योजना, नांदेड येथे फळ प्रक्रिया केंद्र, जालन्यात सीड पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हवामानाच्या अचूक माहितीसाठी हवामान केंद्र, दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी  राष्ट्रीय दूग्ध विकास मंडळाच्या माध्यमातून विदर्भ मराठवाड्यातील दूष्काळग्रस्त 11 जिल्ह्यातील 3 हजार गावामध्ये सुमारे 340 कोटीचे प्रकल्प, फलोत्पादन विकासातंर्गत सुमारे 17 हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजने अंतर्गत आत्महत्याग्रस्त  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील दोन वर्षात 68 लाख शेतकऱ्यांना सुमारे 1400 कोटी रुपयांचे धान्य देण्यात आले आहे. तसेच दूष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिक्षण शुल्क ही माफ करण्यात आले आहे.
कृषी विभागाच्या योजना आणि तंत्रज्ञान अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी शासन प्रयत्नशिल असून प्रधानमंत्री पीक विमा योजना, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, जमीन आरोग्य पत्रिका, स्व. गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना, एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, बहुपीक पध्दती आदी कल्याणकारी योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. सद्या बदलत असलेले ऋतुचक्र लक्षात घेता शेतकरी बांधवांनी कमी पाण्यावरील पिके घ्यावीत. तसेच आत्याआधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी असे अवाहन ही पालकमंत्री कांबळे यांनी यावेळी केले.
यावेळी कृषि सभापती प्रल्हादराव राखोंडे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, शिवाजीराव माने यांची ही समायोचित भाषणे झाली.
प्रारंभी सर्वप्रथम पालकमंत्री कांबळे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात खत विक्रेत्यांना ई-पॉस मशीनचे वितरण करण्यात आले. तसेच औंढा तालूक्यातील तुर्क पिंपरी या गावाने जलयूक्त शिवार अभियान अंतर्गत उत्कृष्ट काम करुन सहभाग नोंदविल्या बद्दल पालकमंत्री कांबळे यांच्या हस्ते गावाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास शेतकरी बांधव, विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

**** 

No comments: