15 October, 2019

वाहनांची तपासणी बारकाईने करा खर्च निरीक्षक जुंगीओ यांच्या सूचना





वाहनांची तपासणी
 बारकाईने करा
खर्च निरीक्षक जुंगीओ यांच्या सूचना

          हिंगोली, दि. 14 : मतदानाची तारीख अवघ्या सात दिवसांवर आल्यामुळे वाहनांची तपासणी अधिक बारकाईने करा. संशयास्पद वाहतुकीवर नजर ठेवून तपासणी करा, अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे खर्च निरीक्षक नानगोथुंग जुंगीओ यांनी आज येथे दिल्या.
            खर्च निरीक्षक जुंगीओ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात खर्च विषयक समन्वय अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळीस त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी खर्च विषयक समितीचे जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. देविदास हिवाळे, संपर्क अधिकारी गणेश वाघ, वसमत, कळमनुरी आणि हिंगोली मतदार संघातील खर्च समन्वय अधिकारी आणि भरारी पथकाचे अधिकारी उपस्थित होते.
            खर्च निरीक्षक नानगोथुंग जुंगीओ यांनी सांगितले की, मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल तसे बेकायदेशीर वाहतूक होण्याची शक्यता आहे. या वाहतूकीव्दारे मतदारांना प्रलोभन देण्यासाठी पैसे अथवा वस्तूंची वाहतूक होऊ शकते. त्यामुळे आता संशयास्पद वाहतूकीवर बारकाईने लक्ष ठेवा. त्याचबरोबर वाहनांच्या तपासणीवेळी नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
            फ्लाईंग स्क्वॉड, स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम यांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, अशा सूचना श्री. जुंगीओ यांनी समन्वय अधिकारी श्री. हिवाळे यांना केल्या.
*****

No comments: