06 January, 2023

 नेहरु युवा केंद्राच्या वतीने हिंगोली तालुका क्रीडा स्पर्धा संपन्न

क्रीडा स्पर्धामध्ये युवक-युवतींचा प्रचंड उत्साह

                                   




हिंगोली (जिमाका), दि. 06 : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरु युवा केंद्र हिंगोली आणि वाटसरु फाउंडेशन हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने 05 जानेवारी रोजी तालुका क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम व समारोपीय सोहळ्याने संपन्न झाल्या.

हिंगोली तालुका क्रीडा संकुलात सदरील स्पर्धांचा शुभारंभ नेहरु युवा केंद्राचे 1993 चे आदर्श युवा पुरस्कारार्थी दलितमित्र डॉ. विजय निलावार यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व हिरवी झेंडी दाखवून झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून हृदय रोग तज्ञ डॉ.संजय नाकाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नामदेव कोरडे, योग अध्यापक रत्नाकर महाजन उपस्थित होते.

प्रास्ताविकात नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांनी या स्पर्धा युवक-युवतींच्या भावी करिअर ची नांदी ठरणार असल्याने खेळाडूंनी मन लावून खेळून स्पर्धा जिंकाव्या अस सांगितले. तसेच अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धाचे आयोजन औंढा नागनाथ तालुक्यात करण्यात येणार असून वसमत येथेही अशाच आयोजनाचा लाभ युवक-युवतींना मिळाला असल्याचे आशिष पंत यांनी सांगितले.

उदघाटनपर भाषणात डॉ. विजय निलावार यांनी नेहरु युवा केंद्र हे युवक-युवती व राष्ट्र कल्याणाचे कार्य करीत असून अनेक योजना राबवत असल्याने त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

वयोमर्यादा 15 ते 19 वर्ष असलेल्या  युवकानी 100 मीटर व 1600 मीटर धावणे, गोलाफेक, कब्बडी  तसेच  युवतींनी 100 मीटर, 800 मीटर धावणे आणि गोलाफेक स्पर्धेत सहभागी  होऊन खेळाडू वृतीचं प्रदर्शनही केलं. राष्ट्रीय खेळाडू व कोच एकता स्पोर्टस् अकादमीचे प्रमुख गजानन आडे, इंडीयन फोर्स अकॅडमीचे प्रमुख व राष्ट्रीय खेळाडू व कोच रवी हंनवते, राष्ट्रीय खेळाडू चंद्रकला जाधव, कब्बडीचे कोच व पंच सर्वश्री जफरखान पठाण, शंकर कंठे, इस्माईल पठाण, नामदेवराव सोळंके यांच्या माध्यमातून परीक्षण समितीने दिलेल्या निर्णयानुसार विजेत्यांना मेडल, प्रमाण पत्र, ट्रॉफी देवून मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. कबड्डी या सांघिक खेळामध्ये प्रथम क्रमांक बेलवाडी संघ, द्वितीय क्रमांक खांबाळा संघ, तर तृतीय क्रमांक नवल गव्हाण संघ, विजेत्या संघाला ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

उदघाटन आणि बक्षीस वितरण समारंभाचे संचालन नेहरु युवा केंद्राचे हिंगोली तालुका युवा समन्वयक प्रवीण पांडे यांनी केले. नेहरु युवा केंद्राचे जिल्हा प्रमुख आशिष पंत, युवा  समन्वयक नामदेव फरकंडे, प्रदीप पाटोळे, कृष्णा पखवाने, बाळू नागरे, अनिल बिंनगे, चेतन कोरडे यासह वाटसरु फाउंडेशन हिंगोली व सर्व संबंधितानी परिश्रम घेतले.

*****

No comments: