24 January, 2023

 

मतदार नोंदणी प्रक्रिया व जनजागृती अभियानात हिंगोली जिल्ह्याची राज्यात उत्कृष्ट कामगिरी

  • जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह दिलीप कच्छवे, डॉ.सचिन खल्लाळ, क्रांती डोंबे यांचा होणार सन्मान

 

हिंगोली (जिमाका), दि. 24 : भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 13 वा राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ (एसएनडीटी विद्यापीठ) आणि जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर व मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम दि. 25 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.30 या कालावधीत  पाटकर सभागृह, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ (एसएनडीटी विद्यापीठ), चर्चगेट, मुंबई  येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमामध्ये मागील वर्षभरात राज्यामध्ये मतदार नोंदणी प्रक्रिया तसेच मतदार जनजागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या राज्यातील 6 जिल्हा निवडणूक अधिकारी, 7 उप जिल्हा निवडणूक अधिकारी, 12 मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचा सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

मागील वर्षभरात मतदार नोंदणी प्रक्रिया तसेच मतदार जनजागृती अभियानात हिंगोली जिल्ह्याने राज्यात उत्कृष्ट कामगिरी करत औरंगाबाद विभागातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप कच्छवे, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, श्रीमती क्रांती डोंबे या अधिकाऱ्यांचा सन्मान 25 जानेवारी रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

राज्यस्तरावर सन्मानासाठी/पुरस्कारासाठी निवड झालेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी दि. 25 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता वरील ठिकाणी उपस्थित रहावे, अशी विनंती निवडणूक आयोगाने केली आहे.

****

No comments: