06 January, 2023

 

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

मत कसे नोंदवावे याबाबत मतदारांसाठी सूचना

 

        हिंगोली (जिमाका), दि. 06 : महाराष्ट्र विधानसभेच्या 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक-2023 चा कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 30 जानेवारी, 2023 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही निवडणूक मतदान प्रक्रिया इतर निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. या निवडणुकीसाठी मतपत्रिकेवर (Ballot paper) मतदान होणार आहे. मतदाराला मतदान हे पसंती क्रमानुसार करावयाचे आहे. मतदान करताना आयोगाने उपलब्ध करुन दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करणे मतदारांना बंधनकारक आहे. अशा सर्व बाबी मतदारांना माहिती होण्यासाठी मत कसे नोंदवावे याविषयी मतदारांना देण्यात आलेल्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत.

(1) मतदान करण्यासाठी केवळ मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळ्या रंगाचा स्केचपेनचाच वापर करावा. याशिवाय इतर कुठलेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईन्ट पेन यांचा वापर करु नये.

(2) ज्या उमेदवारास तुम्ही पहिला पसंतीक्रम देण्यासाठी निवडले आहे, त्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम (Order of Preference) असे नमूद केलेल्या रकान्यात "1" हा अंक नमूद करुन मतदान करावे.

(3) निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या एका पेक्षा जास्त असेल तरी "1" हा अंक केवळ एकाच उमेदवाराच्या नावासमोर नमूद करावा.

(4) निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या कितीही असली तरी तुम्हाला जेवढे उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तेवढे पसंतीक्रम नोंदविता येतील.

(5) उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर तुमचा पुढील पसंतीक्रम 2, 3, 4  इत्यादी अंक तुमच्या पसंतीक्रमानुसार पसंतीक्रम" (Order of Preference) या स्तंभामध्ये दर्शवा.

(6) कोणत्याही उमेदवारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद करावा. एकच अंक एका पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावा समोर नमुद करु नये.

(7) पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शविला जाईल. उदा. 1, 2, 3, इत्यादी आणि तो एक, दोन, तीन, इत्यादी असा शब्दात दर्शवू नये.

(8) अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरुपात जसे 1, 2. 3, इत्यादी किंवा रोमन स्वरुपातील I, II, III. इत्यादी किंवा संविधानाच्या 8 व्या अनुसुचितील भारतीय भाषेतील अंकाच्या स्वरुपात नोंदविता येतील.

(9) मतपत्रिकेवर तुमची  स्वाक्षरी  किंवा आद्याक्षरे किंवा नाव किंवा कोणतेही शब्द नमूद करु नये. तसेच अंगठ्याचा ठसा उमटवू नये.

(10) तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर () किंवा (X) अशी  खूण करु नये, अशी मतपत्रिका बाद ठरेल.

(11) तुमची मतपत्रिका वैध ठरण्यासाठी  उमेदवारांपैकी  एकाच्या  नावासमोर  "1"  हा अंक नमूद करुन तुमचा पहिला पसंतीक्रम दर्शविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम हे ऐच्छिक स्वरुपाचे असून ते अनिवार्य नाहीत.

        मतदान करताना मतदारांनी वरील सूचनांचे पालन करुनच मतदान करावे, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ तथा उपायुक्त (सामान्य प्रशासन), विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ तथा जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी  केले आहे.

*****

No comments: