02 August, 2023

 

हेल्मेट युक्त कार्यालय अपघात मुक्त कार्यालय अभियानाचा

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते शुभारंभ

  

हिंगोली (जिमाका), दि. 02 : राज्य परिवहन आयुक्तांच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालये, खाजगी आस्थापना इत्यादीमध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हेल्मेट युक्त कार्यालय अपघात मुक्त कार्यालय या अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यात रस्ते अपघाताच्या संख्येत व मरण पावलेल्या नागरिकाच्या संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी लक्षणीय वाढ झालेली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी चिंता व्यक्त केली आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय व निम शासकीय कार्यालय तसेच खाजगी संस्था, कंपनी येथील आस्थापनेवरील दुचाकी वापरणारे अधिकारी व कर्मचारी, सर्व कॉलेज मधील विद्यार्थी, सामान्य नागरिक जे दुचाकीवरुन कार्यालयास भेट देतात. यांना हेल्मेट परिधान करुनच कार्यालयात प्रवेश द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यातील महत्वाच्या शासकीय कार्यालयामध्ये रस्ते सुरक्षा कार्यशाळा यापुढे आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये रस्ते सुरक्षेचे विविध नियम, हेल्मेट व सिट बेल्ट यांचा कसोशीने वापर इत्यादीवर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयांच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सोमवार, दि. 31 जुलै पासून हेल्मेट परिधान न करता विविध कार्यालयात दुचाकी घेऊन जाणाऱ्या दुचाकी चालक व मागे बसलेल्या व्यक्तीविरुध्द कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिले आहेत.

या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी रस्ते अपघातामध्ये हेल्मेट न घालता प्रवास केल्यामुळे झालेली हानी या बाबतचा वैयक्तीक अनुभव कथन करुन दुचाकी चालविल्यामुळे अत्यंत जवळच्या व्यक्तींना प्राणास मुकावे लागले असल्याचे अनुभव त्यांनी कथन केले.  

******

No comments: