29 August, 2023

 

घरोघरी भेटी देऊन मतदार पडताळणीचे काम शंभर टक्के पूर्ण करावेत

-- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : भारत निवडणूक आयोगाने दि. 01 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअनुषंगाने राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी हा कार्यक्रम सर्व उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी (ERO), सर्व तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्या स्तरावरुन राबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शुक्रवार, दि. 21 जुलै, 2023 पासून घरोघरी भेटी देऊन मतदार पडताळणीचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यात एकूण मतदार संक्ष्या 9 लाख 34 हजार 368 इतकी असून आतापर्यंत 5 लाख 90 हजार 893 इतक्या मतदारांची पडताळणी करण्यात आली आहे. त्याची टक्केवारी 63.24 टक्के इतकी आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी , सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांनी त्यांच्या स्तरावरुन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याद्वारे घरोघरी भेट देऊन मतदारांची शंभर टक्के पडताळणी करण्यासाठी निर्देशित करण्यात आले आहे. तसेच काम न केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यावर नियमानुसार जिल्हास्तरावरुन कार्यवाही केली जाईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिले आहेत.

*******   

No comments: