01 August, 2023

 

सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करावे

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 


हिंगोली (जिमाका), दि. 1 : महसूल विभाग हा प्रशासनातील सर्वात महत्वाचा विभाग आहे. महसूल विभाग हा लोकांशी नाळ जोडलेला विभाग आहे. त्यामुळे शासनाच्या सर्वाधिक योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी ह्या विभागाकडे असून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

महसूल दिनानिमित्त येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित महसूल सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, संतोष राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीणकुमार धरमकर, उपविभागीय अधिकारी  उमाकांत पारधी, सचिन खल्लाळ, सर्व तहसीलदार यावेळी उपस्थित होते.

            यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, महसूल  विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी एकोप्याने काम केल्यामुळेच आपला हिंगोली जिल्हा नेहमीच आघाडीवर आहे. आपले हे स्थान कायम ठेवण्यासाठी यापुढेही आपले सहकार्य आवश्यक आहे. आपला उत्साह, काम करण्याची ताकद, मनापासून काम करण्याची पध्दत यामुळे आपल्या जिल्ह्याचे स्थान कायम आहे. आपली प्रामाणिकपणे काम करण्याची वृत्तीमुळे हिंगोली जिल्हा मराठवाड्यात चांगले काम करत आहे. यावर्षी शासनाने महसूल सप्ताह साजरा करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या महसूल सप्ताहात नागरिकांच्या समस्या, तक्रारी सोडविण्याचे काम प्राधान्याने सोडवून जतनेशी नाळ जोडण्याचे काम करावे. या अभियानात एक हात मदतीचा या उपक्रमात जनतेमध्ये जाऊन त्यांच्या संवेदना ऐकूण त्यांचे काम करावे आणि अनेक योजनाचा लाभ मिळवून देऊन जनतेचे अश्रू पुसण्याचे काम करावे, असेही श्री. पापळकर म्हणाले.

            पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी महसूल व पोलीस विभाग हे प्रशासनाचे डबल इंजिन आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने परस्पर सहकार्याने काम केल्यास जनतेची कामे करणे सोयीचे होणार आहे, असे सांगून सर्वांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

            मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यानी नवीन तंत्रज्ञानानुसार प्रशासनाने झालेले बदल स्वीकारुन काम करणे आवश्यक आहे. तसेच आपले ज्ञान नवीन पिढीला देऊन त्यांना सक्षम केले पाहिजे. तसेच लोकांमध्ये जाऊन जनतेची कामे करुन लोकसंपर्क ठेवला पाहिजे. तसेच आपल्या सहकाऱ्यांशी कुटुंबातील सदस्य म्हणून वागणूक दिली पाहिजे, असे सांगून महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

            अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी म्हणाले, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. न्याय देण्याची भूमिका आपल्याकडे असल्यामुळे आपण सर्वांनी मिळून शासनाने राबवित असलेले सर्व कार्यक्रम यशस्वी करु शकतो. त्यामुळे शासनाने आपल्यावर महसूल सप्ताह साजरा करण्याची जबाबदारी सोपविली आहे. सर्वांनी एकमेकांच्या सहकार्याने कामे केल्यामुळेच हिंगोलीतील मोठ्या प्रमाणावर शेतरस्ते मोकळे करण्याचे काम झाले आहे. त्यामुळे मेरा माटी मेरा देश, आझादी अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव यासारखे विविध कार्यक्रम यशस्वी करुन जिल्ह्याचा नावलौकिक करावा, असे आवाहन केले.

            यावेळी तहसीलदार नवनाथ वगवाड, तलाठी संघटनेचे आर. डी. गिरी, विनोद ठाकरे, आयुब, महसूल संघटनेचे प्रतिनिधी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले. आभार प्रदर्शन औंढाचे तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले.

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव

            गेल्या वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा महसूल दिनी सन्मान करण्यात आला. यामध्ये अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार नवनाथ वगवाड, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी बारी सिध्दीकी, लघुलेखक एन. एस. बोलके, एस.एन. कदम, जी. डी. शिंदे, डी.टी. पंचलिंगे, मंडळ अधिकारी सय्यद आयुब, के. एन. अंभोरे, आर. व्ही. सावंत, आशा गिते, महसूल सहायक एस.एन. पाटील, बी.एम. व्यवहारे, अ.खालेद, राहूल रेणगुंटवार, तलाठी जी.एस.रणखांब, व्ही.एन. ठाकरे, सुप्रिया जिंतूरकर, वाहनचालक मारोती शिरसाठ, शिपाई दिलीप भुक्तर, यशवंत वरड, एस.एन. लिंमकर, दिलीप ऐंगडे, देवजी मिस्कुटे, कोतवाल सतीश शिंदे, संदीप गाभणे, संतोष बर्वे, अमरदास पारीसकर यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 

            यावेळी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

*****

No comments: