23 August, 2023

 

जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यासाठी हिंगोली येथे मतदार जनजागृती रॅली

उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी हिरवी झेंडी दाखवून केला रॅलीचा शुभारंभ

 

 


 हिंगोली (जिमाका),  दि. 23 : जिल्ह्यामध्ये स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी तथा स्वीप समितीचे नोडल अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी हिंगोली तालुक्यात सुरु आहे. त्यामध्ये नवमतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यासाठी आज दिनांक 23 ऑगस्ट,2023 रोजी हिंगोली तहसील कार्यालय व विविध महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये  येथील जिल्हा परिषद बहुविध प्रशाला  व कन्या प्रशाला, शांताबाई मु.दराडे मा.वि.भारतीय विद्या मंदीर, सक्रर्टहार्ट इंगलीश हायस्कुल,  सरजुदेवी भिकुलाल भारुका ऑर्य कन्या विद्यालयातील सुमारे 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थी रॅलीचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.

ही रॅली  तहसील कार्यालय येथून निघून शिवाजी चौक, पोस्ट ऑफिस, जवाहर रोड, गांधी चौक, इंदिरा चौक मार्गे संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्याच्या हातामध्ये मा. भारत निवडणुक आयोगाने पुरविलेले बॅनर व घोषणा फलक देवून मतदार जनजागृतीच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी तहसीलदार नवनाथ वगवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचारी, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****

No comments: