31 August, 2023

 

जिल्हा प्रशासनाला व्यसनमुक्तीचे बंधन

नशाबंदी मंडळाचा उपक्रम

 



 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : व्यसनमुक्तीचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या राज्यव्यापी नशाबंदी मंडळाच्या वतीने जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी तथा नशामुक्त भारत अभियान समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांना रक्षाबंधन दिनानिमित्त बुधवार, दि. 30 ऑगस्ट रोजी व्यसनमुक्ती राखी बांधण्यात आली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नशामुक्त भारत अभियान अंतर्गत जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद आणि नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्तीच्या प्रसारार्थ रक्षाबंधन उपक्रम राबविण्यात आले.

व्यसनांना आळा घालणे तसेच व्यसनींचे मत परिवर्तन करुन त्यांना निर्व्यसनी बनविण्याचा उपक्रम सुरु आहे. रक्षाबंधन हा कठीण काळात साथ देणाऱ्या, रक्षण करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानण्याचा दिवस आहे. रक्षाबंधनाचा मुख्य गाभा म्हणजे रक्षण, संरक्षण करणाऱ्यांना अभिवादन करणे, त्यांचे आभार मानणे हा आहे. रक्षाबंधन या उत्सवामध्ये एक प्रकारची बांधिलकी आहे. जी बांधिलकी जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने अभिप्रेत करते आणि म्हणूनच हे असे बंधन आहे. जे सातत्याने व्यसनांपासून रक्षा करण्याची यथोचित मागणी करते. महाराष्ट्र शासनाचे व्यवसनमुक्ती धोरण अधिक सक्षमपणे राबविण्यासाठी रक्षाबंधनानिमित्त नशाबंदीमंडळाच्या वतीने विनंती करण्यात आली. या उपक्रमात नशाबंदी मंडळाच्या जिल्हाध्यक्षा शुभदा सरोदे, जिल्हा संघटक विशाल अग्रवाल, अनुप्रिता भाले, अनिता चोंढेकर, ज्योती काथळकर, आर.एस.गडगिळे आदीनी सहभाग घेतला.

रक्षाबंधनानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांना विविध घोषवाक्यांच्या माध्यमातून रक्षाबंधनाचा उपक्रम राबविल्याबद्दल नशाबंदी मंडळ आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे सहायक आयुक्त समाज कल्याण तथा नशामुक्त भारत अभियान समितीचे सचिव आर. एच. एडके यांनी कौतूक केले.

 

*****  

No comments: