23 August, 2023

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी

28 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करावेत

 

हिंगोली (जिमाका),  दि. 23 : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना व संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात येतो. सन 2020-21, सन 2021-22, सन 2022-23 व सन 2023-24 या वर्षासाठी जिल्हास्तरीय, विभागस्तरीय व राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी हिंगोली जिल्ह्यातील पात्र महिला, संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

जिल्हास्तरीय, विभागस्तरीय व राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे पात्रता व स्वरुप पुढीलप्रमाणे आहे.

पुरस्कारासाठी पात्रता :

राज्यस्तरीय पुरस्कार :- महिला व बालविकास क्षेत्रात किमान 25 वर्षांचा सामाजिक कार्याचा अनुभव आवश्यक आहे. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्या महिलांना सदर पुरस्कार मिळाल्यापासून 5 वर्ष राज्यस्तरीय पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही.

विभागीय पुरस्कार :- महिला व बालविकास क्षेत्रात किमान संस्थेचे किमान 7 वर्ष कार्य असावे. संस्थेस दलितमित्र पुरस्कार मिळालेला असल्यास पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही. संस्था राजकारणापासून अलिप्त असावी तसेच संस्थेचे कार्य व सेवा राजकारणापासून अलिप्त असावी. स्वयंसेवी संस्था पब्लिक ट्रस्ट अॅक्ट व सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्टनुसार किमान 7 वर्षापूर्वी नोंदणीकृत झालेली असावी.

जिल्हास्तरीय पुरस्कार :- महिला व बालविकास क्षेत्रात किमान 10 वर्ष सामाजिक कार्य असावे. ज्या महिलांना दलितमित्र पुरस्कार किंवा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे, त्या महिलांना जिल्हास्तरीय पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही.

पुरस्काराचे स्वरुप :

राज्यस्तरीय पुरस्कार एक लाख एक रुपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. विभागीय पुरस्कार 25 हजार एक रुपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे, तर जिल्हास्तरीय पुरस्कार 10 हजार एक रुपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ अशा स्वरुपात असणार आहे.

प्रस्तावासोबत जोडावयाची आवश्यक माहिती / कागदपत्रे :

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव धारकाची माहिती, केलेल्या कार्याचा तपशील, वृत्तपत्रात प्रसिध्द झालेली कात्रणे व फोटोज सध्या कार्यरत असलेल्या पदांचा तपशील, यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर किंवा इतर कोणताही पुरस्कार मिळाला असल्यास संपूर्ण तपशील तसेच  मा.जिल्हा पोलीस अधीक्षक,हिंगोली यांचे अलीकडील कालावधीचे चारित्र्य पडताळणी  अहवाल आदी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

विभागीय पुरस्कारासाठी संस्थेची माहिती व कार्याचा तपशील, वृत्तपत्रात प्रसिध्द झालेली कात्रणे व फोटोज,

संस्थेस यापूर्वी  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर किंवा इतर कोणताही पुरस्कार मिळाला असल्यास संपूर्ण तपशील, संस्था नोंदणी प्रमाणपत्र आणि घटना व नियमावलीची प्रत, संस्थांचे पदाधिकारी यांचे चारित्र्य चांगले आहे. त्यांच्याविरुध्द कोणताही फौजदारी तसेच त्यांनी सार्वजनिक संपत्तीचा अपहार केल्याबाबतचा गुन्हा दाखल नसल्याचे व संस्थेचे कार्य, संस्था राजकारणापासून अलिप्त असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

            वरील पुरस्कारांसाठी सन 2020-21, सन 2021-22, सन 2022-23 व सन 2023-24 या वर्षासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र महिला समाजसेविकांनी व संस्थांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. 07, नांदेड रोड, हिंगोली  ई-मेल : dwandcdoh@gmail.com या पत्त्यावर दिनांक 28 ऑगस्ट, 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत आपले प्रस्ताव सादर करावेत.

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन राजाभाऊ मगर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

 

******

No comments: