27 February, 2024

बीएच मालिकेतील नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी अर्ज करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 27 : केंद्र शासनाने खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना तसेच शासकीय कार्यालयामध्ये/विभागामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना बीएच मालिकेमध्ये नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी अर्ज करण्याबाबत तसेच त्यामध्ये अशा वाहनांवर आकारण्यात येणाऱ्या कराविषयी तरतूद केली आहे. ही अधिसूचना दि. 15 सप्टेंबर, 2021 पासून अंमलात आली आहे. बीएच मालिकेतील नोंदणी चिन्हांसाठी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या अर्जदारास नमुना 60 मध्ये वर्कींग सर्टिफिकेट व शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अर्जदारास कार्यालयीन ओळखपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. नमुना 60 नुसार अर्ज करणाऱ्या अर्जदारास ज्या खाजगी कंपनीत, संस्थेत करतो त्या कंपनीचे किमान 4 किंवा त्यापेक्षा जास्त कार्यालये राज्यात किंवा संघराज्य क्षेत्रात असणे आवश्यक आहे. अर्जदारास नियम 48 मध्ये नवीन परंतुकानुसार बीएच मालिकेतील नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करणे अर्जदारास ऐच्छिक असणार आहे. नवीन नियम 51बी मध्ये फुली बिल्ट (Fully Built) परिवहनेत्तर वाहनाचा मोटार कराच्या आकारणीबाबत यापूर्वीच्या दि. 17 सप्टेंबर, 2021 च्या परिपत्रकान्वये सर्व कार्यालय प्रमुखांना कळविण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार सर्व प्रादेशिक कार्यालयांना बीएच मालिकेतील नोंदणी संदर्भातील कार्यपध्दती कळविण्यात आली आहे. परंतु अनेक कार्यालयाकडून कार्यवाही करताना अडचणी व कार्यपध्दतीमध्ये संभ्रम निर्माण होत असल्यामुळे खालील सूचनांचे पालन करावेत. खाजगी संस्थेतील तथा शासकीय सेवेतील वाहनधारकांची त्यांच्या संस्थेची , शासकीय कार्यालयाची भारतातील विविध राज्यामध्ये कार्यालये आहेत. अशा वाहनधारकांकडून मागील काळात त्याचा विविध राज्यातील वास्तव्याचा दाखला तसेच मागील कार्यकाळातील वेतन देयके प्राप्त करुन अर्ज करण्यापूर्वी वाहनधारक सद्यस्थितीत ज्या विभागात, कंपनीत अस्तित्वात आहे. त्याच विभागात, कंपनीमध्ये तो यापूर्वी इतर राज्यात कार्यरत होता का ? ही बाब तपासावी व त्यानंतरच त्याचे वाहन बीएच सिरीजमध्ये नोंदणीसाठी ग्राह्य धरावे. तथापि, केवळ त्याच्या कंपनीचे चार राज्यात शाखा आहेत अथवा त्याची इतर राज्यात बदली होऊ शकते, असे नमूद करुन अर्ज केल्यास केवळ त्या कारणास्तव बीएच सिरीजमध्ये वाहन नोंदणी करु नये. बीएच सिरीजचा लाभ प्रती व्यक्ती फक्त एका वाहनासाठीच देण्यात यावा. बीएच सिरीज नोंदणीचा लाभ पात्र व्यक्तीसच मिळण्यासाठी बीएच सिरीजमध्ये अर्ज केलेल्या वाहन मालकांने स्वत:च्या बँक खात्यातून वाहन खरेदीसाठी रक्कम अदा केली असल्याबाबत पुरावा तपासावा. अर्जदारांनी उपरोक्तप्रमाणे माहिती सादर न केल्यास किंवा सादर केलेल्या पुराव्यात विसंगती आढळल्यास त्यांचा अर्ज नाकारावा. 25 लाख किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीची चारचाकी वाहने तसेच दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त किमतीची दुचाकी वाहने बीएच सिरीज नोंदणीसाठी आल्यास अशा वाहनधारकाचे आयटी रिटर्नस किंवा बँक खात्याची विवरणपत्रे तपासावे. वाहनधारकाची खरोखरच आर्थिक क्षमता आहे किंवा नाही हे बघून नोंदणीसंदर्भात निर्णय घ्यावा. भारतीय सुरक्षा दलातील वाहनधारकांच्या वाहनांचे बीएच सिरीजमध्ये नोंदणी करताना त्यांचे फक्त सुरक्षा दलाचे ओळखपत्र घ्यावे. त्यांच्याकडे इतर कागदपत्राची मागणी/तपासणी करु नये. बीएच सिरीजमध्ये नोंदणी केलेल्या व नोंदणी कालावधीत दोन वर्षापेक्षा जास्त झालेल्या वाहनधारकांनी पुढील कालावधीसाठीचा कर भरणा केलेला आहे किंवा नाही ते तपासावे. पुढील कालावधीचा कर भरलेला नसल्यास अशा वाहनधारकांना मागणीपत्र पाठवावे. वाहन धारकांनी कराचा भरणा न केल्यास अशा वाहनावर मुंबई मोटार वाहन कर कायदा 1958 मधील कलम 12 (बी) व केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 51 (ब) अन्वये कर वसुलीबाबत आवश्यक ती कायदेशीर करावी, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी कळविले आहे. ******

No comments: