17 February, 2024

अनाधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी नवीन धोरण जाहीर ना नफा ना तोटा तत्वावर वाळू विक्रीचे दर निश्चित करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करावेत

• जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन हिंगोली (जिमाका), दि. 17 : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. 16 फेब्रुवारी, 2024 च्या शासन निर्णयानुसार नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करुन देणे तसेच अनाधिकृत वाळु उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू / रेतीचे उत्खनन, साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण जाहीर केलेले आहे. या नवीन वाळू धोरणानुसार हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव, वसमत तालुक्यातील हट्टा, सेनगाव तालुक्यातील लिंबाळा तांडा व बरडा येथे वाळू डेपो तयार करण्यात आले आहेत. तसेच शासनाच्या निर्देशानुसार नदीतून वाळूचे उत्खनन, वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन यासाठी संबंधित जिल्ह्यातील डेपोनिहाय प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या निविदेमध्ये प्राप्त होणारा निविदेतील अंतिम दर (GST सह), स्वामित्वधनाची रक्कम, शासनामार्फत आकारण्यात येणारा जिल्हा खनिज प्रतिष्ठाण निधी, पर्यावरण शुल्क व नियमानुसार अनुज्ञेय शुल्क/कर इत्यादी, वाळू डेपोतून वाळू वाहतूकीचा खर्च ग्राहकांना करावा लागेल. या अटीवर वरील डेपोवरुन ग्राहकांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करण्यात येत आहे. वरील प्रमाणे दर निश्चित करुन डेपोत उपलब्ध होणाऱ्या वाळुच्या प्रमाणात ऑनलाईन प्रणालीवरुन वाळू विक्री करण्यात येणार आहे. वाळू धोरण 2024 च्या अनुषंगाने वाळु बुकींग करण्यासाठी प्रथम इंटरनेट ब्राऊजरवर https://mahakhanij.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर भेट द्यावी. वेबसाईट ओपन झाल्यानंतर वरील बाजूस SAND BOOKING असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे. SAND BOOKING वर क्लिक केल्यानंतर संकेतस्थळ नवीन विंडो मध्ये उघडेल. त्यानंतर LOGIN या बटनावरती क्लिक करावे. त्यानंतर CONSUMER SIGN UP क्लिक करुन त्यामध्ये नाव, मोबाईल नंबर व स्वतःचा ई-मेल आय डी. इत्यादी आवश्यक माहिती भरावी. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर LOGIN मध्ये USERNAME म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करतेवेळी दिलेला मोबाईल क्रमांक व मोबाईल मध्ये प्राप्त झालेला पासवर्ड (OTP) टाकुन LOGIN करावे. त्यानंतर प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन मध्ये घर, इमारत, घरकुल, ईत्यादी बाबत आपली माहिती भरुन प्रोजेक्ट रजिस्टर करावा. त्यानंतर आपल्याला प्रोजेक्टसाठी आवश्यक असलेल्या वाळूची बुकींग करावी. व आपल्या जवळील अथवा संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ठिकाणाचा STOCKYARD निवडावा. शेवटी ऑनलाईन पावतीने बुकींग केलेल्या वाळूचे पेमेंट करुन त्याची प्रत प्राप्त करुन घ्यावी व संबंधित STOCKYARD वर जाऊन पैसे भरल्याची प्रत जमा करुन वाळू प्राप्त करुन घ्यावी. वाहतुकीचा खर्च सबंधित ग्राहकाने करावा. वरीलप्रमाणे ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करुन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. ******

No comments: