27 February, 2024

वनाच्छादन वृद्धीसाठी वृक्षारोपणासह ती जगवणे आवश्यक - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

• दुधाळा वनपरीक्षेत्रात वृक्षारोपण हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्ह्यात वनाच्छादन क्षेत्र वाढवायचे असेल तर वृक्षारोपण करण्यासोबतच लावलेली रोप जगविणेही तितकेच आवश्यक आहे. या परिसरात वृक्षवाढीसाठी शेततळ्याच्या माध्यमातून शाश्वत सिंचनाची सोयही केली असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. दुधाळा येथील मराठवाडा 136 इको बटालियन वनपरीक्षेत्र परिसरात आज जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी बोलत होते. लेफ्टनंट कर्नल विशाल रायजदा, विभागीय वनाधिकारी मनोहर गोखले, सिद्धटेक संस्थानचे महंत आत्मानंद गिरी, भारतीय माजी सैनिक कल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष सयद मीर, बाबुराव जांबुतकर, पंडीत हाके उपस्थित होते. सध्या राज्यात वनाच्छादित क्षेत्र कमी असून, पुढील पिढ्यांचा विचार करता सर्वांना वृक्षारोपण करून ती रोपे वाचवावी लागतील. हे वृक्ष वाचविले तरच राज्यातील वनाच्छादन वाढेल. पुढील 100 वर्षात निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करायची असेल तर वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. जिल्ह्यातील जंगल क्षेत्रात वाढ झाल्यास वन्यप्राण्यांचा येथील शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी होईल. तसेच वन्यप्राण्यांना जंगलातच खाद्य मिळेल आणि जैवविविधतेची आणि पर्यायाने सजिवांची अन्नसाखळी सुरक्षित राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी केले. 136 बटालियनने वृक्षारोपण करण्यासाठी केलली तयारी पाहता, पावसाळ्यात लाखो वृक्षांची लागवड होणार आहे. त्यामुळे भविष्यात येथील वाढणाऱ्या वृक्षाराजीमुळे डोंगर बोडके दिसणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी आंबा, जांभूळ, नारळ, वड, कडूनिंब, काजू, बदाम, बांबू, अर्जुन, सिताफळ, आवळा, करंजी आदी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली असून, येथे शेततळ्याच्या माध्यमातून शाश्वत सिंचनाची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी वृक्षारोपणासाठी लागणारी रोपे सामाजिक वनीकरण विभाग, वन विभागाच्या विविध शासकीय रोपवाटीकांमधून उपलब्ध करण्यात येणार आहे. शिवाय 136 बटालीयन परिसरात उन्हाळ्यात रोपे तयार करण्यात येणार असून, लाखभर खड्डे तयार करण्यात येतील. या खड्ड्यांमध्ये काळी माती टाकण्यात आली असून, पाऊस पडल्यानंतर येथे लाखो झाडे लावण्यात येतील, असे लेफ्टनंट कर्नल श्री. रायजदा यांनी सांगितले. हिंगोली येथील ओम साई इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी, मुख्याध्यापक गजानन बांगन, दीपाली आमले, वर्षा शिंदे, शुभांगी पतंगे, वनपाल संदीप वाघ, सुदाम गायकवाड, पंजाब चव्हाण, भालचंद्र पवार आदी उपस्थित होते. सुभेदार विनोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. *****

No comments: