29 February, 2024

दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित मंडळामध्ये शासनाच्या विविध उपाययोजना तातडीने अंमलात आणा - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

हिंगोली,(जिमाका)दि. 29 : राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यातील जून ते सप्टेंबर, 2023 या कालावधीत महसुली मंडळामध्ये सरासरी पर्जन्यमानाच्या 75 टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मि.मी. पेक्षा कमी झाले आहे. अशा 1021 महसुली मंडळांपैकी आणि दि. 10 नोव्हेंबर, 2023 च्या शासन निर्णयानुसार सर्व जिल्ह्यातील महसुली मंडळांमध्ये शासनाच्या विविध उपाययोजना तातडीने अंमलात आणण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता, भांडेगाव, कळमनुरी तालुक्यातील साळवा, औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर आणि शिरड शहापूर, सेनगाव तालुक्यातील पुसेगाव आणि बाभुळगाव ही सात महसूल मंडळे दुष्काळ सदृश्य मंडळे म्हणून घोषित करून सवलती लागू केल्या आहेत. याशिवाय ज्या महसुली मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसूली मंडळ स्थापन केली आहेत आणि अद्यापही पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले नाहीत, अशीही मंडळे यामध्ये समाविष्ट आहेत. जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषि पंपाच्या चालू विज बिलात 33.5 टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलती लागू केल्या आहेत. या महसुली मंडळांना देण्यात येणाऱ्या विविध सवलतीपोटी आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन द्यावा. तसेच या उपाययोजना तातडीने अंमलात आणावेत, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिले आहेत. ******

No comments: