23 February, 2024

‘महासंस्कृती महोत्सवा’त पहिल्या दिवशी संस्कृती आणि देशभक्तीपर गीतांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हिंगोली (जिमाका), दि. 23 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने येथील रामलीला मैदानावर ‘महासंस्कृती महोत्सवा’च्या उद्घाटन समारंभानंतर स्वरराज प्रस्तुत रसिकांनी महाराष्ट्राची लोकधारा, लोकसंस्कृती तसेच देशभक्तीपर गीतांवर प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जल्लोष केला. या महासंस्कृती महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी सायंकाळी 6 वाजता स्थानिक कलावंतांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले. यामध्ये लोकसंस्कृतीमध्ये येथील आईचा गोंधळ, अहिल्याबाई होळकरांचा पोवाडा यासह गणेशवंदनाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये विलास गंगाधर गोडसे व त्यांची चमू गोंधळ घातला. तर देविदास वाकुडे व त्यांची चमूने वासुदेव आणि मधुकर निवृत्ती इंचेकर व त्यांची चमूने आपल्या पहाडी आवाजाने उपस्थितांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लींग चेतविले. याशिवाय हास्य कलाकार शाहीर रमेश गिरी यांच्या हसवेगिरीने उपस्थितांची हसवून पुरेवाट लावली. प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे यांनी संकल्पना, दिग्दर्शन केलेला स्वरराज प्रस्तुत जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा हा कार्यक्रम सादर करण्यात आला, या कार्यक्रमात मंगेशकर घराण्यातील सुप्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर यांच्या सुमधूर आवाजाची उपस्थितांना भुरळ पडली. यामध्ये गणेशवंदन, ‘लयं भारी’मधील विठ्ठल विठ्ठल… माऊली माऊली, ‘जोगवा’ चित्रपटातील ललाटी भंडार उधळत, आई भवानीचा गोंधळ घालत उपस्थितांना भक्ती रसात चिंब चिंब भिजवले. याशिवाय वंदे मातरम् गीताने भारतभूमीला वंदन केले. ‘वेदांत मराठे वीर दौडले सात’, ‘नया दौर’मधील ‘ये देश है वीर जवानों का’ गात उपस्थितांना देशभक्तीत तल्लीन केले. ‘ढोलकरं, ढोलकरं, मी दर्याचा राजा’ या कोळीगीताने उपस्थितांना समुद्रकिनारी नेले. याशिवाय ‘काळ्या मातीत मातीत, तिफन चालते’ या गीतातून कृषिप्रधान देशात श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या आणि जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरीराजाचा सन्मान केला. तसेच मराठवाडा भूषण सन्मानित गायक-संगीतकार प्रमोद सरकटे, सूर नवा, ध्यास नवा विजेती सुप्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे यांनी राधा मंगेशकर यांना स्वरसाथ देत महाराष्ट्राच्या ‘बुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला’ या ठसकेबाज लावणीतून उपस्थित प्रेक्षकांना ‘घुमर घुमर’ करत रंगीलो राजस्थानात नेले. कॉमेडी स्कीट म्हणून ज्युनीअर जॉनी लिव्हरने विमानाचे टेक ऑफ आणि लँडीग होतानाचे आवाज, दिवंगत सिने अभिनेते अमरीश पुरी, अभिनेता शाहरुख खानच्या गीतांवरील अभिनय, जॉनी लिव्हर आणि परेश रावल यांच्यातील संवादानेही उपस्थितांची वाहवा मिळवली. त्याशिवाय हिंगोलीच्या रामलीला मैदानावर होत असलेल्या कार्यक्रमाबाबतच्या राजकीय पुढाऱ्यांच्या प्रतिक्रियेची हुबेहुब नक्कल केली. शनिवारचे कार्यक्रम शनिवार, दि. 24 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वाजता हिंगोली येथील प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये बबन दिपके व त्यांची चमू छत्रपती शिवाजी महाराज गीत, चंद्रभान सोनार व चमू वाघ्या-मुरळी, पांडूरंग धोंगडे व चमू गोंधळ, गणपतराव इचलकर व चमू वासुदेव, अशोक इंगोले व त्यांची चमू स्वच्छता अभियान, केशव खटींग व त्यांची चमूची काव्यसंमेलन ही मैफल काव्यरसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. सायं. 6.30 वाजता सुशांत शेलार यांची संकल्पना व दिग्दर्शित केलेला महाराष्ट्राचा लोकोत्सव हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यासाठी निवेदिका म्हणून पूर्वी भावे काम पाहणार आहेत. माधुरी पवार, अभिजीत केळकर नृत्य सादर करणार आहेत. तर गायक म्हणून मनीष राजगिरे व यांच्यासोबत 45 कलाकारांचा संच असणार आहे. हास्य कलाकाराची भूमिका मंगेश मोरवेकर सादर करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला पुढील चारही दिवसाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कार्यक्रमस्थळी लवकर येऊन आसनस्थ व्हावे व या महासंस्कृती महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. *****

No comments: