21 February, 2024

शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 21 : सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण, हिंगोली या कार्यालयांतर्गत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिंनीसाठी प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वसतिगृह सुरु करण्यात येणार आहे. या वसतिगृहामध्ये इमाव-51, विजाभज-33, विमाप्र-6, दिव्यांग-4, अनाथ-02 व आर्थिक मागास प्रवर्ग-4 असे एकूण 100 विद्यार्थी व 100 विद्यार्थिनीसाठी प्रवेशासाठी सामाजिक आरक्षण लागू असेल. सन 2023-24 साठी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी दि. 5 मार्च, 2024 या कालावधीत ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावेत. या प्रवेशाची पहिली निवड यादी दि. 15 मार्च, 2024 पर्यंत गुणवत्तेनुसार अंतिम करुन प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 25 मार्च, 2024 ही अंतिम मुदत राहील. रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची दि. 28 मार्च, 2024 रोजी गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना दि. 5 एप्रिल, 2024 रोजी प्रवेश देण्यात येणार आहे. वसतिगृह प्रवेशासाठी नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. सक्षम प्राधिकाऱ्यांने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला तसेच वैध जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. अर्जदार विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी असावे. विद्यार्थ्यांचे वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थ्यांने राज्य शासन, विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद/वैद्यकीय परिषद, भारतातील फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, कृषि परिषद, महाराष्ट्र तंत्र शिक्षण परिषद वा तत्सम सक्षम प्राधिकारी यांच्यामार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालयामध्ये मान्यता प्राप्त पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा. उच्च शिक्षणासाठी (व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहांमध्ये गुणवत्तेनुसार तसेच संबंधित प्रवर्गनिहाय विहित आरक्षणानुसार प्रवेश देण्यात येतील. यासाठी इयत्ता बारावीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात 70 टक्के जागा व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात 30 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील. विद्यार्थी स्थानिक नसावा. व्यावसायिक व बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यास या योजनेसाठी अर्ज करताना किमान 60 टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन/सीजीपीएचे गुण असणे आवश्यक राहील. या वसतिगृहामध्ये प्रवेश हा व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश देय राहील. ज्या पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यास पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षास प्रवेश देय आहे त्याच पदवी अभ्यासक्रमास द्वितीय वर्षासाठी प्रवेश देय राहील. उर्वरित सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्ष प्रवेश देय राहील. त्यासाठी त्या त्या वेळी स्वतंत्रपणे जिल्हा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे विहित नमुन्यात प्रवेशासाठी अर्ज करावा लागेल. प्रवेशासाठी लागणारे ऑफलाईन अर्ज सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दर्गा रोड, हिंगोली यांच्याकडे विनामूल्य उपलब्ध आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी विहित वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, हिंगोली यांनी केले आहे. ******

No comments: