19 February, 2024

हिंगोली येथे गुरुवारपासून पाच दिवस ‘महासंस्कृती महोत्सव’

हिंगोली येथे गुरुवारपासून पाच दिवस ‘महासंस्कृती महोत्सव’ • पालकमंत्री व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन • महासंस्कृती महोत्सव 2024 हिंगोलीचा नागरिकांनी लाभ घ्यावा - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार • जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा, सदाबहार संगीत रजनी, महाराष्ट्राचा लोकोत्सव, केशर केवडा व लख लख चंदेरी या कार्यक्रमाची रसिकांना मिळणार अनुभूती हिंगोली (जिमाका), दि. 19 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रथमच ‘महासंस्कृती महोत्सव’आयोजित करण्यात येत आहे. या महासंस्कृती महोत्सवाचे गुरुवार, दि. 22 ते दि. 26 फेब्रुवारी, 2024 पर्यंत रामलीला मैदान हिंगोली येथे दररोज सायंकाळी 6 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या पाच दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याचे उद्घाटन गुरुवार दि. 22 फेब्रुवारी, 2024 रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, यांच्यासह खा. हेमंत पाटील, आमदार सर्वश्री. सतीश चव्हाण, विक्रम काळे, विप्लव बाजोरिया, प्रज्ञा सातव, तान्हाजी मुटकुळे, चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, संतोष बांगर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. विकास खारगे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात -अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली येथे या महोत्सवाचा प्रारंभ गुरुवार, दि. 22 फेब्रुवारी पासून होत आहे. दि. 22 ते 26 फेब्रुवारी दरम्यान हिंगोली येथील रामलीला मैदानावर होणाऱ्या या पाच दिवसीय महोत्सवात जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा, सदाबहार संगीत रजनी, महाराष्ट्राचा लोकोत्सव, केशर केवडा व लख लख चंदेरी यासह स्थानिक कलाकारांच्या कलेची रसिकांना अनुभूती मिळणार आहे. यात गुरुवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी उद्घाटनाच्या दिवशी सायं. 5 वाजता हिंगोली येथील प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये विलास गंगाधर गोडसे व त्यांची चमू गोंधळी, देविदास वाकूडे व त्यांची चमू वासुदेव, मधुकर निवृत्ती इंचेकर व त्यांची चमू शाहिरी व हास्य कलाकार शाहीर रमेश गिरी हे हसवेगिरी ही कला सादर करणार आहेत. सायंकाळी 6.30 वाजता प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे यांनी संकल्पना, दिग्दर्शन केलेला स्वरराज प्रस्तूत जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यामध्ये गायक, गायिका म्हणून मंगेशकर घराण्यातील सुप्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर, मराठवाडा भूषण सन्मानित गायक-संगीतकार प्रमोद सरकटे, सूर नवा, ध्यास नवा विजेती सुप्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे यांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये 32 कलाकारांद्वारे नृत्याचे सादरीकरण होणार असून कॉमेडी स्कीट म्हणून नामवंत टीव्ही कलावंत प्रकाश भागवत, प्रविण डाळिंबकर, सागर भोईर हे काम पाहणार आहेत. शुक्रवार, दि. 23 फेब्रुवारी रोजी सांय. 5 वाजता हिंगोली येथील प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये प्रविण पांडे व त्यांची चमू शस्त्र प्रदर्शन व शिवकालीन नृत्य , सुनिता भिमराव रणवीर व त्यांची चमू भारुड, नारायण धोंगडे व त्यांची चमू जागरण गोंधळ, शेख जावेद चीस्ती व त्यांची चमू कव्वाली, हाफीज फहीम आजीज व त्यांची चमू मुशायरा ही कला सादर करणार आहेत. सायं. 6.30 वाजता प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे यांनी संकल्पना, दिग्दर्शन केलेला स्वरराज प्रस्तुत सदाबहार संगीत रजनी कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यामध्ये अप्सरा फेम सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नृत्य सादर करणार आहे. गायक व गायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेती प्रसिद्ध पार्श्वगायिका सावनी रविंद्र, झीटीव्ही सारेगमप विजेती गायिका अमृता नातू, मराठवाडा युवारत्न सन्मानित रॉकस्टार गायक स्वराज सरकटे हे राहणार आहेत. यामध्ये 32 कलावंताद्वारे बहारदार सादरीकरण करण्यात येणार आहे. नामवंत विनोदी कलावंत रामेश्वर भालेराव व कलीम पटेल यांचा कॉमेडियन शो रसिकांचे मनोरंजन करणार आहे. शनिवार, दि. 24 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वाजता हिंगोली येथील प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये बबन दिपके व त्यांची चमू छत्रपती शिवाजी महाराज गीत, चंद्रभान सोनार व चमू वाघ्या-मुरळी, पांडूरंग धोंगडे व चमू गोंधळ, गणपतराव इचलकर व चमू वासुदेव, अशोक इंगोले व त्यांची चमू स्वच्छता अभियान, केशव खटींग व त्यांची चमूची काव्यसंमेलन ही मैफल काव्यरसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. सायं. 6.30 वाजता सुशांत शेलार यांची संकल्पना व दिग्दर्शित केलेला महाराष्ट्राचा लोकोत्सव हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यासाठी निवेदिका म्हणून पूर्वी भावे काम पाहणार आहेत. माधुरी पवार, अभिजीत केळकर नृत्य सादर करणार आहेत. तर गायक म्हणून मनीष राजगिरे व यांच्यासोबत 45 कलाकारांचा संच असणार आहे. हास्य कलाकाराची भूमिका मंगेश मोरवेकर सादर करणार आहेत. रविवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वाजता हिंगोली येथील प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये पांडूरंग पाबळे व चमू वाघ्या-मुरळी, शिवाजी राऊत व चमू जागरण गोंधळ घालणार असून, शेषराव कावरखे यांची चमू बेटी बचाव-बेटी पढाओ, शाम धोंगडे यांची चमू नाटिका, श्रीरंग दांडेकर यांची चमू भीमगीते सादर करणार आहेत. सायं. 6.30 वाजता केशर केवडा हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यासाठी कौस्तुभ दिवाण हे निवेदक म्हणून काम पाहणार आहेत. जुई बेंडखळे, आय्ली घिलीया, आरती शिंदे, सोनाली पाटील व स्मिता शेवाळे हे नृत्य सादर करणार आहेत. यासाठी आनंदी जोशी, चेतन लोखंडे व 25 कलाकारांचा संच गायन सादर करतील. महासंस्कृती या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी सोमवार, दि. 26 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वाजता हिंगोली येथील प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये उत्तम इंगोले यांचा चमू पोवाडा, शांताबाई पाईकराव यांचा चमू सामाजिक प्रबोधन, रामराव जाधव यांचा चमू लेहंगी नृत्य (बंजारा पारंपारिक नृत्य), नामदेव दिपके यांचा चमू लेक वाचवा-लेक शिकवा, प्रकाश दांडेकर यांचा चमू मतदार जनजागृती, शंतनू पोले यांचा चमू 'कोरलाय शिवबा काळजावर' या विषयावर सादरीकरण करणार आहे. सायं. 6.30 वाजता लख लख चंदेरी-2024 कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. यासाठी पुष्कर श्रोत्री हे निवेदन करणार आहेत. राजेश्वरी खरात, गौरी कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, श्वेता खरात हे कलाकार नृत्य सादर करणार आहेत. यासाठी मयुर सुकाळे यांचे गायन असणार आहे. कमलाकर सातपुते आणि किशोरी अंबिये यांच्यासोबत 25 कलाकारांचा संच स्कीट सादर करणार आहे. याबरोबरच दि. 22 ते 26 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज सचित्र दालन व शस्त्र पद्रर्शन, राज्य संरक्षित स्मारके व गडकिल्ले यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यक्रम, प्रदर्शन तसेच वस्त्र संस्कृती दालन, हस्तकला वस्तू दालन, बचत गटांचे उत्पादन दालन, पर्यटनविषयक दालन उभारण्यात येणार आहेत. तसेच कुस्ती, रांगोळी स्पर्धाही घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. महासंस्कृती महोत्सव 2024 चा नागरिकांनी आस्वाद घ्यावा - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या महाराष्ट्राला कला व संस्कृती यांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. रूढी, परंपरा, सण, उत्सव, महोत्सव यामधून आपला महाराष्ट्र; सामाजिक, वैचारिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ झालेला आहे. महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये महाराष्ट्रातील लोककला, कृषी संस्कृती, चित्रपट, नाटक, शास्त्रीय संगीत, आदिवासी संस्कृती यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात स्थल-कालानुसार वेगवेगळे कला व संस्कृतीचे प्रकार पहावयास मिळतात. राज्यातील विभिन्न प्रदेशातील विभिन्न संस्कृतीचे दर्शन, प्रत्येक जिल्ह्यातील रसिकांना व्हावे यासाठी महासंस्कृती कार्यक्रमाचे आयोजन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी करण्यात येत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात, संपूर्ण राज्याच्या कला व संस्कृतीचे दर्शन होईल. त्यामुळे आपण सर्व हिंगोलीकरांनी या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला पाचही दिवसाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कार्यक्रमस्थळी लवकर येऊन आपले आसन ग्रहण करावे व या महासंस्कृती महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ******

No comments: