12 August, 2021

 



उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते

एनएसएसच्या विद्यार्थ्यांचा सत्कार

 

हिंगोली (जिमाका), दि. 12 :  राज्यातील तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी आपल्या जिवाची परवा न करता महसूल मित्र, आरोग्य मित्र अशा विविध भूमिकेतून आपली सामाजिक बांधिलकी जपत कोरोना योध्दे म्हणून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या येथील तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विनोद साळवे या विद्यार्थ्यांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर, प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बरगे, रासेयोचे समन्वयक शिवराज बोकडे आणि प्रभारी प्राचार्य एफ.बी. तानुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्री. सामंत म्हणाले की, कोविडच्या महामारीत मागील दीड वर्षापासून राज्यातील नागरिकांना आरोग्य व इतर सुविधा पुरविण्यासाठी शासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या कालावधीत मदतीसाठी कोणीही पुढे येत नव्हते, तेंव्हा राष्ट्रीय सेवा योजनेची साथ मिळण्यासाठी त्यांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार या आपत्तीच्या कालावधीत राज्यातील तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी आपल्या जिवाची परवा न करता महसूल मित्र, आरोग्य मित्र अशा विविध भूमिकेतून आपली सामाजिक बांधिलकी जपत कोरोना योध्दे म्हणुन कार्य केले आहे. या कोरोनासारख्या कठीण परिस्थितीत रासेयोच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेवून त्यांच्या कार्याचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून एका  विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे.

कोरोनाच्या आपत्तीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तंत्रशिक्षण महाविद्यालय हिंगोली येथील विनोद साळवे या विद्यार्थ्यांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राध्यापक-कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

****

No comments: