14 August, 2021

 

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित

 

        हिंगोली, (जिमाका) दि. 14 : भारत निवडणूक आयोगाने 01 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला असून मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दि. 04 ऑगस्ट, 2021 च्या पत्रान्वये हा कार्यक्रम सर्व उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी (ERO)/ सर्व तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्या स्तरावरुन राबविण्याच्या सूचना/ निर्देश प्राप्त झाले आहेत. छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे पुढिलप्रमाणे आहेत.

            पुनरिक्षण पूर्व उपक्रम : या अंतर्गत दुबार, मयत नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे , मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत घरोघरी भेटी देऊन तपासणी, पडताळणी करणे. मतदार यादीचे योग्य प्रकारे भाग, विभाग तयार करणे. मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण करण्याचे काम सोमवार, दि. 9 ऑगस्ट, 2021 ते रविवार, दि. 31 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत करण्यात येणार आहे.

            पुनरिक्षण उपक्रम : या अंतर्गत एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी  प्रसिध्दीचे काम सोमवार, दि. 01 नोव्हेंबर, 2021 रोजी करण्यात येणार आहे. नमुना नं. 6, 8 व 8अ मधील दावे आणि नमुना नं 7 मधील हरकती स्वीकारण्याचा कालावधी सोमवार, दि. 01 नोव्हेंबर, 2021 ते मंगळवार, दि. 30 नोव्हेंबर, 2021 असा आहे. विशेष मोहिमांचा कालावधी हा दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी निश्चित केलेल्या दिवशी राहील. दावे व हरकती निकाली काढण्याचा कालावधी सोमवार, दि. 20 डिसेंबर, 2021 पर्यंत राहील. बुधवार, दि. 05 जानेवारी, 2022 रोजी मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे.

            वरील तपशिलानुसार सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचा 01 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार सर्व उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी (ERO)/ सर्व तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्या स्तरावरुन दि. 09 ऑगस्ट, 2021 ते दि. 31 ऑक्टोबर,2021 दरम्यान दुबार अथवा समान नोंदी,  एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देवून तपासणी, पडताळणी, योग्य प्रकारे विभाग, भाग तयार करणे आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.

            दि. 01 नोव्हेंबर, 2021 रोजी एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून दि. 01 नोव्हेंबर, 2021 ते 30 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत मतदार यादीत नवीन नाव नोंदणीसाठी नमुना नं. 6, नोंदीतील दुरुस्तीसाठी नमुना नं. 8 व त्याच विधानसभा मतदारसंघात नाव स्थलांतरीत करण्यासाठी नमुना नं. 8अ मधील दावे आणि मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी नमुना नं. 7 मधील हरकती सर्व संबधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी (ERO) तसेच तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांचे कार्यालयातील मतदार मदत कक्षा (VHC) मार्फत स्वीकारण्यात येतील.

            दि. 01 नोव्हेंबर, 2021 रोजी प्रसिध्द होणाऱ्या प्रारुप मतदार याद्यांमध्ये ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट नसतील, असे मतदार तसेच दि. 01 जानेवारी, 2022 रोजी ज्यांचे वय अठरा वर्ष पूर्ण होत आहे,  अशा सर्व पात्र नागरिकांना नाव नोंदणीसाठी विहित नमुना नं. 6 मधील अर्ज सादर करता येईल.  मतदार याद्यांतील नाव वगळणीबाबत आक्षेप असतील तर प्रती व्यक्ती पाच या मर्यादेत नमुना नं. 7 मध्ये हरकती नोंदवीता येतील.  तसेच मतदार यादीतील नोंदीत दुरुस्त्या, सुधारणा करावयाच्या असल्यास नमुना नं. 8 मधील दावे , आणि त्याच विधानसभा मतदार संघात नाव स्थलांतरीत करावयाचे असल्यास नमुना नं. 8 अ मधील दावे नोंदविता येतील. सर्व दावे व हरकती दि. 01 नोव्हेंबर, 2021 ते दि. 30 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत सर्व संबधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी (ERO) तसेच तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांचे कार्यालयातील मतदार मदत कक्षा (VHC) मार्फत स्वीकारण्यात येतील.

            छायाचित्रासह मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रमादरम्यान प्रत्यक्ष मतदान केंद्रांच्या ठिकाणी दोन विशेष मोहिमांचे (स्पेशल कॅम्पेन) आयोजन करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी निश्चित केलेल्या विशेष मोहिमांच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओ स्वतः हजर राहून अर्ज व  छायाचित्र स्वीकारण्याची कार्यवाही करणार आहेत.

            सदर छायाचित्रासह मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रमासाठी मा.भारत निवडणूक आयोगाची मान्यता प्राप्त असलेल्या राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक याप्रमाणे मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची (BLA) नेमणूका करुन त्यांची विहीत नमुन्यातील यादी संबधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी (ERO) तसेच तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांना उपलब्ध करुन द्यावी. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या वतीने उपजिलहा निवडणूक अधिकारी दिलीप कच्छवे यांनी केले आहे.

 

*****

No comments: