25 January, 2022




 लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदार नोंदणी करणे आवश्यक

                                                                              -  उप जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप कच्छवे

 

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक असून त्यासाठी मतदार यादीत नावनोंदणी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन उप जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप कच्छवे यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुजित जाधवर, तहसीलदार नवनाथ वगवाड यांची  प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. कच्छवे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकांस निवडणुकीत मतदानाचा एक फार महत्त्वपूर्ण अधिकार प्रदान केला आहे. मतदान हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य असून याची जाणीव झाल्याशिवाय जगातील सर्वात मोठी असलेली आपली लोकशाही सुदृढ होणार नाही. मतदान हा एक मौल्यवान अधिकार आहे. यासाठी 18 ते 20 वयोगटातील युवकांनी पुढाकार घेवून आपली मतदार नोंदणी करावी. तसेच याबाबत समाजामध्ये जनजागृती करावी, असे सांगितले.

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त नवमतदारांना यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात मतदार ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थितांना उप जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप कच्छवे यांनी मतदानाची प्रतिज्ञा दिली. यावेळी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले.

कार्यक्रमास नायब तहसीलदार जी. एस. जिडगे, डी. एस. जोशी यांच्यासह निवडणूक विभागातील कर्मचारी तसेच प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. शेवटी तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी  सर्व उपस्थितांचे आभार मानले.

****

No comments: