25 January, 2022

 आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यात हिंगोली जिल्हा अग्रेसर

 

 राज्यात दोन वर्षापूर्वी महाविकास आघाडीचे शासन सत्तेत आल्यावर नवीन विकास कामे सुरु होण्यापूर्वीच कोरोनामुळे अनेक निर्बंध आले. मागील दोन वर्षापासून कोविड-19 विषाणूने धुमाकूळ घातलेला होता. या आजारामुळे अनेक माणसे मृत्यूमुखी पडले. अनेक कुटुंबियांना त्यांची जवळची माणसे गमवावी लागली. या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली. या आपत्तीत आरोग्य व्यवस्थेचे महत्व लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी नियोजन तयार करण्यात आले. कोरोना निर्बंधामुळे व्यापार, उद्योग मंदावल्यामुळे शासनाची आर्थिक आवक देखील थांबलेली असतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र कधी थांबला नाही व थांबणार नाही’ असा विश्वास प्रकट करत राज्याच्या आर्थिक चक्राला गती दिली. जिल्ह्याच्या व राज्याच्या उत्पन्नातून अधिकाधिक खर्च हा आरोग्य व्यवस्थेवर करुन आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे काम केले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्याने अपुऱ्या संसाधनांसह दिलेला लढा अभूतपूर्व आणि इतरांसाठी आदर्शवत आहे. हिंगोली जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. तरीही खबरदारी म्हणून 15 फेब्रूवारी, 2020 पासून पूर्व नियोजन करुन ठेवण्यात आले होते. हिंगोली जिल्ह्यात पहिला कोविड रुग्ण 2 एप्रिल, 2020 रोजी वसमत शहरामध्ये आढळला. जिल्हास्तरावर डिस्ट्रीक्ट टास्क फोर्स कमिटी तयार करुन ट्रेस, टेस्ट, ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचा वापर करुन जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्या सर्व नागरिकांची शासकीय क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती करुन त्यांची कोविड-19 ची तपासणी करण्यात आली. यामध्ये कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णास शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. बाहेरील जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला होम क्वारंटाईन मध्ये न ठेवता त्यास क्वारंनटाईन सेंटर मध्येच ठेवण्यात आले. अशी उपाययोजना करणारा हिंगोली हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. कोणत्याही परिस्थितीत रुग्णास होम क्वारंटाईन किंवा होम आयसोलेशन मध्ये राहण्याची मुभा देण्यात आली नाही.

  डिसेंबर-जानेवारीच्या सुमारास कोरोनाची पहिली लाट अंतिम टप्प्यात आली असे वाटत असतानाच फेब्रुवारी-2021 मध्ये रुग्णसंख्या वाढू लागली. त्यानंतर ती झपाट्याने वाढत गेली. कोरोनाची ही दुसरी लाट अधिक तीव्र होती. मात्र या संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने युध्दपातळीवर प्रयत्न केले. ऑक्सिजन, रेमडेसिवीरची कमतरता आणि वैद्यकीय मनुष्यबळाची कमी अशा संकटातही  हिंगोली जिल्ह्याने धीराने आणि संयमाने कोरोना विरोधात दिलेला लढा वाखाणण्यासारखा आहे. आता तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या अनुभवातून जिल्हा प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नाने शहरी व ग्रामीण यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.

जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नेतृत्वाखाली शहरी व ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅटंची उभारणी करण्याबरोबरच बेड्सची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला. शासन व लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकारातून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन साठा व अन्य  आरोग्य उपकरणाची व्यवस्था करण्यात आली. परिणामी सध्या हिंगोली जिल्ह्यात बेडस्‌ची व ऑक्सिजनची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे.

सन 2020 मध्ये पहिल्या लाटेच्या वेळी कोरोना उपचारासाठी अत्यल्प असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालय, कोविड केअर सेंटरवरील 18 केंद्रावर 121 आयसीयू, 847 ऑक्सिजन व 2856 सर्वसाधारण असे एकूण 3944 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयात लहान मुलांसाठी वेगळा कोविड वार्ड तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महिला व लहान मुलांसाठी 100 खाटांचे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. तसेच लेवल तीनचे इंटेन्सिव पेडीयाट्रीक केअर युनिट व 20 खाटांचे एन.आय.सी.यू., 25 स्वतंत्र व्हेंटीलेटर, आणि 124 खाटांचे एस.एन.सी.यु. उपलब्ध करण्यात आले आहे.

 यासोबतच कोविड केअर सेंटर, ऑक्सिजन निर्मिती, औषधांची उपलब्धता, लसीकरण, कोरोना चाचणीच्या प्रयोगशाळा, ऑक्सिजन बेड्स आदींच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा बळकट करण्यात आली आहे. तसेच नव्याने बांधण्यात येत असलेल्या वसमत येथील स्त्री रुग्णालय व इतर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी बेडची क्षमता वाढ करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील रुग्णावर वेळीच उपचार होण्यासाठी जिल्ह्यातील सिध्देश्वर, कौठा, डोंगरकडा व शिरड शहापूर या चारही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना रुग्णांसाठी प्रत्येकी 50 बेड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.  तसेच ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रातही ऑक्सिजनची उपलब्धता करुन देण्यात आली आहे.

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्यामुळे जिल्ह्यात 7 क्रायो ऑक्सिजन टँक, 4 ऑक्सिजन प्लाँट कार्यान्वित करण्यात आले असून आणखी 2 ऑक्सिजन प्लाँट लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. सध्या दररोज 6.25 मे. टन ऑक्सिजन तयार होत आहे. आज रोजी जिल्ह्यात 900 ऑक्सिजन बेड व 1 हजार 884 नॉन ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. तसेच हिंगोली  जिल्ह्यात कोविड-19 साठी स्वतंत्र 100 खाटांचे सर्व सोयीनी युक्त कोविड रुग्णालय तयार करण्यात आले आहे. यामध्ये सेंट्रल ऑक्सिजन लाईन, व्हेंटीलेटर, डायलिसीस युनिटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या वेळी दररोज 8 मे. टन ऑक्सिजनचा वापर करण्यात आला होता. तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यात 124.42 मे.टन ऑक्सिजन साठवणूक करण्यात आली आहे. तसेच पालकमंत्री यांच्या पुढाकारातून हिंगोली जिल्ह्यासाठी नवीन ॲम्ब्यूलन्स उपलब्ध करुन देण्यास पुढाकार घेतला. आज प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ॲम्ब्यूलन्स उपलब्ध झाल्या आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात एड्स सारख्या रुग्णांसाठी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या पुढाकारातून स्वतंत्र एआरटी केंद्र उभारण्यात आले आहे. भारतात असे एकूण 3 एआरटी केंद्र असून महाराष्ट्रात हिंगोली येथे उभारण्यात आलेले पहिले एआरटी केंद्र आहे. या केंद्रात एच.आय.व्ही. रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

सध्या कोरोनावर लस हा एकमेव उपाय आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 6 हजार 133 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर 5 लाख 1 हजार 971 नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तसेच आता 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींनाही लसीकरण सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 33 हजार 966 मुला-मुलींनी लसीचा डोस घेत चांगला प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सध्या कमी दिसत असले तरीही अद्याप आपला जिल्हा कोरोनामुक्त झालेला नाही. कमी-अधिक प्रमाणात अजूनही रुग्ण आढळून येत आहेत. तसेच देश-परदेशात कोरोना विषाणू आपले रुप पालटून अधिक सशक्त झाल्याच्या बातम्या येत आहेत.  सध्या देशात ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. कोरोना विषाणूपासून आपल्याला बाधा होऊ नये म्हणून लस घेणे आवश्यक आहे. भारतात आतापर्यंत अनेक नागरिकांना कोरोना लसीकरणाचे डोस देण्यात आलेले आहेत. लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. ती पूर्णपणे सुरक्षित आहे. ज्यांनी अद्यापही कोविडची लस घेतली नाही, त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्यावी व ज्याचा दुसरा डोस बाकी आहे, त्यांनी देखील दुसरा डोस घेऊन आपले लसीकरण पूर्ण करावेत.

पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासोबतच सर्वांच्या लसीकरणासाठी आग्रही असून प्रत्येकाने लस घ्यावी, असे आवाहन केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील पायाभूत सुविधा अद्यावत करण्यात येत आहेत.

तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी लोकसहभागही आवश्यक आहे. कोरोना विषाणूपासून स्वत:ला वाचविण्यासाठी मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा अवलंब करुन सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे आहे. कोरोनाने जिवाची किंमत दाखवून दिली आहे. त्यामुळे आपणही लस घ्यावे. तसेच आपल्या परिवारातील सदस्य, मित्र मंडळीना लस घेण्यास सांगून सुरक्षित करावेत. 

 

                                                                                                --  चंद्रकांत स. कारभारी

                                                                                                     माहिती सहायक,

     जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

******

No comments: