24 January, 2022

मतदार जागृतीसाठी : राष्ट्रीय मतदार दिवस

 


मतदार जागृतीसाठी : राष्ट्रीय मतदार दिवस 

             हिंगोली (जिमाका) दि.24 : भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली आहे. त्यामुळे 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मतदार असल्याचा अभिमान मतदारास असावा आणि त्यातून बळकट लोकशाहीसाठी मोठा सहभाग  नोंदवता यावा हा आहे.

            भारतीय लोकशाही गणराज्यात प्रत्येक भारतीय नागरिकाला सार्वत्रिक तथा पोट निवडणुकीत मतदानाचा मुलभूत हक्क बहाल करण्यात आलेला आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव नोंदवून मतदान करण्याचे कर्तव्य पार पाडून लोकशाही बळकट करण्याचा वाटा उचलण्याची संधी प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे.

            भारतातील युवा मतदारांना सक्रीय राजनीतीमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सन 2011 पासून भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून दरवर्षी साजरा करण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत. 

            देशातील प्रत्येक नागरिक हा या देशाचा सुजाण नागरिक असून मतदान करणे हा आपला मुलभूत हक्क असल्याची जाणीव  होण्यासाठी या राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व आहे. या 'राष्ट्रीय मतदार दिवसा' निमित्त 18 वर्ष पूर्ण होत असलेल्या (दिनांक 1 जानेवारी, 2022 रोजी) आणि 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवयुवक युवतींना मतदारांना तसेच ज्या नागरिकांनी अद्यापही यादीत नाव नोंदविले नाही अशा नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे आणि भारत निवडणूक आयोगामार्फत ओळख पत्र मिळवावे.

हिंगोली जिल्ह्यात 01 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर  दि. 5 जानेवारी, 2022 रोजी मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यात एकूण 14 हजार 878 नव मतदारांची वाढ झालेली आहे. आता जिल्ह्यात एकूण 9 लाख 42 हजार 510 मतदार झाले आहेत. यामध्ये 4 लाख 93 हजार 868 पुरुष मतदार, 4 लाख 48 हजार 640 महिला मतदार तर 2 तृतीय पंथी मतदारांचा समावेश आहे. या सर्व मतदारांची मतदार यादीतील छायाचित्रे शंभर टक्के अद्ययावत करण्यात आली आहेत.

            हिंगोली जिल्ह्यात 01 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2022 अंतर्गत दिनांक 01 नोव्हेंबर, 2021 ते 05 डिसेंबर, 2021 या कालावधीत दावे हरकती स्वीकारण्यात आले. सदर दावे व हरकतीवर निर्णय घेण्यात येऊन अंतिम मतदार यादी दिनांक 05 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी  कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील  कार्यालय, सर्व मतदान केंद्र  व मुख्य निवडणूक अधिकारी  यांचे  कार्यालयाचे  https://ceo.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर येथे  प्रसिध्द  करण्यात  आली  आहे.

नव्याने नोंदणी झालेल्या 14 हजार 878 मतदारांना राष्ट्रीय मतदार दिवस- 2022 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने नव्यानेच जारी केलेले स्मार्टसाइज प्लॅस्टीक मतदार ओळखपत्राचे (PVC-EPIC) वाटप त्या-त्या मतदान केंद्राचे ठिकाणी संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांत 03 हजार 266 मतदारांची वगळणी करण्यात आली आहे. मतदार यादीमध्ये 14 हजार 878 मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता एकूण मतदारांची संख्या 9 लाख 42 हजार 510 एवढी झाली आहे.

            हिंगोली जिल्ह्याची सन-2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 11 लाख 77 हजार 345 इतकी असून नोव्हेंबर, 2021 ची अनुमानित (Projected) लोकसंख्या 13 लाख 19 हजार 74 इतकी आहे.  त्यामध्ये एकूण मतदार 9 लाख 42 हजार 510 मतदार आहेत. लोकसंख्येशी मतदाराचे प्रमाण 71.45 टक्के आहे. मतदारांनी आपले नाव अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीत असल्याबाबत खात्री करावी.

            वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या अधिकाधिक तरुणांनी छायाचित्र मतदार याद्यांचा सततचा पुनरिक्षण कार्यक्रम- 2022 च्या कालावधीत आपली नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी, तसेच मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी, मतदार यादीत दुबार नावे असलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी संबधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), संबंधित तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, संबंधित उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावेत किंवा http://www.nvsp.in/ या संकेतस्थळावरून ऑनलाईन सादर करावेत. तसेच यासाठी निवडणूक आयोगाने वोटर हेल्पलाईन हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. त्यामुळे मतदारांना आपल्या मोबाईल फोनमध्ये वोटर हेल्पलाईन ॲप (VHA) डाऊनलोड करुन याद्वारेही नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती करता येणार आहे. याचा सुजाण मतदारांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांना या कार्यक्रमात मतदार ओळखपत्र, बिल्ले प्रदान करुन मतदार दिनाची शपथ देण्यात येणार आहे.

            आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत नव मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्याचा हक्क मिळणार आहे. ही संधी गमावणे म्हणजे आपण आपला भारतीय नागरिक असल्याचा हक्क गमावल्यासारखे आहे ! तर चला मग ! आपण सर्व भारतीय नागरिक या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करुन आपला मतदानाचा हक्क बजावण्यास सज्ज होऊ या !

                                                                        -- चंद्रकांत कारभारी

                                                                            माहिती सहायक

                                                                                                                 जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

*****

 

 

No comments: