06 January, 2022

 


राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर 

 

* 0 ते 5 वर्षे वयोगटातील 1 लाख 29 हजार 748 बालकांना 23 जानेवारीला पल्स  पोलिओ लस देण्याचे नियोजन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 06 :  जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी राबविण्यात येणार आहे. बालकांच्या संपूर्ण सुरक्षितेसाठी पोलिओचा डोस अत्यावश्यक आहे. यासाठी 23 जानेवारी 2022 रोजी 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे. तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करुल पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा दक्षता समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार , अतिरिक्त जिल्हा  आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण केंद्र डॉ. देवेंद्र जायभाये यांच्यासह सर्व वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकार म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांची कोविड चाचणी करण्यात यावी. त्याचबरोबर योग्य मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे. साधनसामुग्री याचीही उपलब्धता ठेवावी.  पोलिओ लसीकरण बुथची योग्य पध्दतीने उपलब्धता ठेवावी. त्याचबरोबर सद्यस्थितीत जिल्ह्यात ऊस तोडणी हंगाम सुरु आहे. यासाठी परजिल्ह्यातून आलेल्या कामगारांच्या कुटुंबातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांचेही लसीकरण होण्यासाठी नियोजन करावे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी महामार्गाचे काम सुरु आहे. त्यासाठीही आलेल्या कामगारांच्या कुटुंबातील बालकांचे लसीकरण करावे. जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशन, बसस्थानके व महत्वाची स्थळे या ठिकाणी पोलिओ लसीकरण बूथ सज्ज ठेवावेत. लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांच्या याद्याप्रमाणे घरोघरी जावून लसीकरणाबाबत संबंधित कुटुंबांना, पालकांना अवगत करावे, असे सांगितले. हे लसीकरण बुधवार दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आले असले तरी पुढील दोन ते तीन दिवस हे लसीकरण सुरु राहणार असल्याने पात्र असणाऱ्या बालकांचे त्यांच्या पालकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने म्हणाले, पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करण्यासाठी गावनिहाय व प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय नियोजन करावे व जास्तीत जास्त बालकांचे लसीकरण होईल याची दक्षता घ्यावी, अशी सूचना केली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार म्हणाले, यासाठी आवश्यक लसही उपलब्ध होणार असून त्याचेही वाहतुकीचे नियोजन करण्यात येईल. आरोग्य विभागाचे कर्मचारी लाभार्थ्यांच्या घरी जावून लसीबाबत योग्य माहिती देतील याचेही नियोजन करण्यात येईल. लसीकरणासाठी नियुक्त करण्यात येणारे अधिकारी व कर्मचारी यांना दिनांक 11 जानेवारी, 2022 रोजी प्रशिक्षणाचा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी जिल्ह्यात एकूण 1 लाख 29 हजार 748  बालके पल्स पोलिओ लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यासाठी त्यांच्या लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे . जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरणाची जास्तीत जास्त जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगून पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची सविस्तर माहिती दिली.

यावेळी सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

****

No comments: