08 January, 2022

 

कोरोनाने निधन झालेल्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकाचे

सानुग्रह सहाय्यासाठी 657 प्राप्त अर्जापैकी 177 अर्ज मंजूर, 14 अर्ज नामंजूर

  • नामंजूर अर्जदारांनी ऑनलाईन अपील करुन संपूर्ण कागदपत्रासह दिलेल्या वेळेत हजर राहण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 08 : राज्यात जी व्यक्ती कोविड-19 या आजाराने निधन झाले आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकटच्या नातेवाईकास राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य प्रदान करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी ऑनलाईन पोर्टल तयार करुन अर्ज मागविण्यात येत आहेत.

हिंगोली जिल्ह्यात आजतागायत 657 अर्ज आले असून यापैकी 177 अर्ज एकत्रितरित्या जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, हिंगोली यांच्यामार्फत मंजूर करण्यात आले आहेत. तसेच आजतागायत 14 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

नामंजूर करण्यात आलेले अर्ज हे अपूर्ण असल्याने, बँक खात्याचा तपशील न जोडल्याने , अर्ज भरताना काही कागदपत्रे चुकून जोडली नसल्याने, अर्ज चुकीचा भरला असल्याने नामंजूर करण्यात आले आहेत. नामंजूर करण्यात आलेल्या अर्जदाराना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संपर्क करुन आपला अर्ज नामंजूर का करण्यात आला आहे याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच दुसऱ्यावेळी अर्ज भरत असताना काय काळजी घ्यावी याबाबत भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात येत आहे.

काही अर्जातील वैद्यकीय प्रमाणपत्रे हे सदर व्यक्तीचा मृत्यू कोरोनाने झालेला नाही, असे दर्शवितात. अशावेळी अर्जदारास अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये आपला अर्ज हा नामंजूर करण्यात आला आहे. कारण आपण जोडलेली वैद्यकीय कागपत्रे हे सदर मृत्यू कोरोनाने झाला नसल्याचे दर्शवितात. याबाबत अर्जदारांनी ऑनलाईन अपील करुन ऑनलाईन देण्यात आलेल्या वेळेत कोरोनाने मयत झालेल्या आपल्या नातेवाईकाची सर्व वैद्यकीय कागदपत्रे, आधार, बँक खाते, आरटीपीसीआर अहवाल, मोलेक्यूलर टेस्ट (Molecular Test), रॅपिड अँटीजेन टेस्ट अहवाल, रुग्णालयात दाखल असताना करण्यात आलेल्या आरोग्य चाचण्याचा अहवाल, तसेच इतर कोणतेही कागदपत्रे जी अर्जदाराच्या मते हा मृत्यू कोरोनाने झाला आहे असे सिध्द होते, अशी सर्व कागदपत्रे घेऊन ऑनलाईन पोर्टलवर देण्यात आलेल्या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*******

No comments: