25 May, 2022

 



पीक कर्जाचे 60 टक्के उद्दिष्ट जून अखेर पर्यंत पूर्ण करावेत

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली (जिमाका), दि. 25 : सर्व बँकानी योग्य नियोजन करुन सन 2022-23 च्या खरीप पी कर्जाचे 60 टक्के उद्दिष्ट जून अखेर पर्यंत पूर्ण करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख जिल्हा व्यवस्थापक शशीकांत सांवत, आरबीआयचे संदीप कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कदम, एसबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक धनाजी बोईले,  विविध बँकेचे अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, दर पंधरा दिवसाला पीक कर्जाचा आढावा घ्यावा. प्रत्येक गावात जाऊन बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे नुतनीकरणाचे व नवीन अर्ज भरुन घ्यावेत. पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जाचे वितरण करावे आणि आपणास देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत. तसेच विविध योजनेचे प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत. यात हयगय करणाऱ्या बँक अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश दिले.

तसेच दहा रुपयाची व इतर नाणी कालबाह्य झालेली नाहीत. ती अद्याप चलनात आहेत. यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करुन ती  चलनात आणावेत. तसेच सर्व बँकेच्या दर्शनी ठिकाणी नाणी व फाटक्‌या , तुटक्या नोटा बदलून मिळतील असे फलक लावावेत, अशा सूचना केल्या.

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त लिड (जिल्हा अग्रणी) बँकेच्या वतीने  दि. 6 जून ते 12 जून या कालावधीत आयकॉनिक वीक साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त आठवडा भर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत. यामध्ये दि. 8 जून रोजी मा.पालकमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात येणार असून यामध्ये विविध योजनेच्या लाभार्थ्याना धनादेशाचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी सर्व बँकानी सहभाग नोंदवावा, असे आवाहन लिड बँकेचे व्यवस्थापक श्री.सावंत यांनी यावेळी केले. 

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने तयार केलेल्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.

******

No comments: