10 May, 2022

 

विजा, भज व विशेष मागास प्रवर्गातील लोकांसाठी

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाच्या विविध योजना

 

राज्य शासनाने वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील लोकांसाठी वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, एक लाख रुपये थेट कर्ज योजना,  बीज भांडवल योजना यासारख्या लाभदायी योजना राबवित आहे.

हिंगोली जिल्ह्यासाठी सन 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी योजनानिहाय उद्दिष्ट प्राप्त झाले असून यामध्ये वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेचे -50, गट कर्ज व्याज परतावा योजनेचे -02, बीज भांडवल कर्ज योजनेचे -50 आणि एक लाख रुपये थेट कर्ज योजनेसाठी- 100 अशाप्रकारे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

जिल्ह्यातील इच्छूक लाभार्थींनी अर्ज करण्यासाठी महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक वि.जा. भ.ज. विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , हिंगोली (मो. 8805872501) येथे संपर्क साधावा.

योजनांची सविस्तर माहिती व आवश्यक कागदपत्रे याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

1) वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना : या योजनेमध्ये वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा 10 लाखापर्यंत असून अर्जदार हा विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे दरम्यान असावा. अर्जदाराचे बँक खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. ही योजना ऑनलाईन असून यासाठी आधारकार्ड, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, शाळेचा दाखला, संबंधित व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल वेबसाईटवर मूळ कागदपत्रासह अपलोड करणे आवश्यक आहे.

2) गट कर्ज व्याज परतावा योजना : या योजनेत कर्जाची मर्यादा 10 लाख रुपये ते 50 लाख रुपयापर्यंत आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत गट असावा. गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मार्गास प्रवर्गातील असावा. गटातील सदस्याचे वय 18 ते 45 वर्षापर्यत असावे. गटातील लाभार्थ्यांचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. गटातील सर्व सदस्यांचे सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 इतका असावा. उत्पन्नाची मर्यादा नॉन क्रिमीनल करिता 8 लाखाच्या मर्यादेत असावी. ही योजना ऑनलाईन असून यासाठी सदस्याचा जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला,रहिवाशी, आधारकार्ड, शाळेचा दाखला, संबंधित व्यवसायाचे कोटेशन, प्रकल्प अहवाल ही सर्व मूळ कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.

3) एक लाख रुपये थेट कर्ज योजना : या योजनेमध्ये महामंडळाकडून एक लाख रुपये थेट कर्ज दिले जाते. या योजनेसाठी दोन जामीनदार व गहाणखत व बोझा नोंद करुन देणे महत्वाचे आहे. यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (एक लाखापर्यंत मर्यादा), रेशन कार्ड, आधार कार्ड, रहिवाशी इत्यादी कागदपत्रासह व्यवसायानुसार कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. या योजनेचे फॉर्म महामंडळाकडून जातीचा मूळ दाखला, आधार कार्ड दाखवून रितसर नोंद करुन अर्जदारास मिळेल.

4) बीज भांडवल योजना : बीज भांडवल योजना ही बँकेमार्फत राबविली जात आहे. यासाठी अर्जदाराने महामंडळाकडे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, रहिवाशी, पॅनकार्ड, व्यवसायानुसार आवश्यक कागदपत्रे जोडून कार्यालयास दाखल करणे महत्वाचे आहे. यापूर्वी लाभार्थ्यांनी कर्जाचा लाभ घेतला असल्यास त्यांना परत कर्ज प्रस्ताव दाखल करता येणार नाही.

 

                                                                                                                संकलन : चंद्रकांत स. कारभारी

  माहिती सहायक,

  जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

*****

No comments: