27 May, 2022

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभियानांतर्गत

पंतप्रधान साधणार पोषण अभियानाच्या लाभार्थ्यांशी व्हि.सी.द्वारे संवाद

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने सन 2022 मध्ये संपूर्ण भारतामध्ये दिनांक 15 ऑगस्ट, 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत भारताचे पंतप्रधान हे दिनांक 31 मे, 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे स्वतः संवाद साधणार आहेत.

त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत पोषण अभियानाच्या 05 लाभार्थी बालके व माता यांच्याशी पंतप्रधान महोदय हे दिनांक 31 मे, 2022 रोजी सकाळी 9.00 जिल्हाधिकारी कार्यालय येथे व्हीसीद्वारे संवाद साधणार आहेत.

हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2022 मध्ये दिनांक 21 मार्च, 2022 ते दिनांक 04 एप्रिल, 2022 या कालावधीत पोषण पखवाड़ा/ पंधरवाडा यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. या अंतर्गत अंगणवाडी केंद्र व गाव पातळीवर ओटी भरण, सुपोषित दिवस, मुलीच्या जन्माचे स्वागत, किशोरवयीन मुलींचे मेळावे, नवविवाहित जोडप्यांचे समुपदेशन, पालक मेळावे, आजी-आजोबा मेळावे, महिला सशक्तीकरण मेळावे, अर्धवार्षिक वाढदिवस साजरे करणे इत्यादी विविध उपक्रम घेण्यात आले. या कालावधीमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये 70 हजार 846 उपक्रम घेण्यात आले. या उपक्रमांमध्ये 18 लाख 90 हजार 784 लोकांनी सक्रीय सहभाग घेतलेला आहे, अशी माहिती महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी दिली आहे.

******

No comments: