31 May, 2022

 

शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी

जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना

हिंगोली (जिमाका), दि. 31 : खरीप हंगाम 2022 मध्ये शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात आणि वेळेत गुणात्मक दर्जाच्या कृषि निवष्ठा एमआरपी दराने उपलब्ध होण्यासाठी आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी हिंगोली येथील कृषि विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत नियमित कृषि निविष्ठा विक्री केंद्राची आणि कृषि निविष्ठांची तपासणी करण्यात येत असते. यानंतरही एखाद्या शेतकऱ्याला कृषि निविष्ठा विक्री केंद्रावरुन कृषि निविष्ठांची खरेदी करताना काही अडचण आल्यास अथवा खरेदी पश्चात खरीप हंगाम संपेपर्यंत कृषि निविष्ठांचा दर्जा व गुणवत्ता इत्यादी बाबतीत काही संशय आल्यास अथवा त्यामध्ये आपली फसवणूक झाली आहे, असे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांच्या तक्रारींचे वेळीच निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर 01 व प्रत्येक तालुक्यात 01 या प्रमाणे पाच तालुक्यात 05 असे एकूण 06 तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक तक्रार निवारण कक्षासमोर भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करण्यात आला आहे.

जिल्हास्तरावर कृषि विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली येथे तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्याचा भ्रमणध्वनी क्र. 9421490222 असा आहे. तर तालुकास्तरावर कृषि विभाग, पंचायत समिती, औंढा नागनाथ (भ्रमणध्वनी क्रमांक 8087889299), कृषि विभाग, पंचायत समिती, वसमत (भ्रमणध्वनी क्र. 9028905357), कृषि विभाग, पंचायत समिती, हिंगोली (भ्रमणध्वनी क्र. 9822699947), कृषि विभाग, पंचायत समिती , कळमनुरी (भ्रमणध्वनी क्र. 9673946799), कृषि विभाग, पंचायत समिती, सेनगाव (भ्रमणध्वनी क्र.9158121718) येथे तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे.

संबंधित तालुक्यातील शेतकरी कृषि निविष्ठांबाबत आपली तक्रार वरील दिलेल्या संपर्क क्रमांकावर दूरध्वनी करुन नोंदवू शकतात. तक्रारीचे स्वरुप पाहून शेतकऱ्यांनी संबंधित गुणनियंत्रण निरीक्षकाकडे , तक्रार निवारण कक्ष प्रमुखाकडे लेखी तक्रार अर्जासोबत कृषि निविष्ठांच्या खरेदीची पावती, सातबारा, होल्डींग इत्यादी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्यास लगेच कळविण्यात येईल. त्यावेळी शेतकऱ्यांनी तक्रार अर्जावर आपला संपूर्ण पत्ता, गाव, तालुका व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवावा. या व्यतिरिक्त शेतकरी आपली तक्रार संबंधित तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयात नोंदवू शकतात, असे कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

******

No comments: