30 May, 2022

 

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ

हिंगोली जिल्ह्यातील तीन अनाथ बालकांना बँक पासबूक, हेल्थ कार्डचे वाटप

 



            हिंगोली (जिमाका), दि. 30 : कोविड-19 मुळे जिल्ह्यातील अनाथ झालेल्या 03 बालकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आज बँक पासबूक, हेल्थ कार्ड यासह            15 लाखाच्या पॅकेजचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेचा प्रारंभ प्रधानमंत्री यांच्या हस्ते बटन दाबून ऑनलाईन करण्यात आला. प्रधानमंत्री श्री. मोदी  यांच्या अध्यक्षतेखाली आज कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या जिल्ह्यातील 18 वर्षाखालील 03 बालकांसोबत जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत वेब कास्टव्दारे संवाद साधला. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एनआयसी हॉल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनीही संबोधित केले. त्यानंतर प्रधानमंत्री यांनी 18 वर्षावरील बालकांसोबत संवाद साधला व 18 वर्षा खालील बालकांना वेब कास्ट व्दारे सहभागी करण्यात आले.

यावेळी  प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी बालकांशी संवाद साधतांना तुमच्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्यासाठी संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे. पुस्तक हे तुमचे उत्तम मार्गदर्शक असून साहसाने तुम्ही आयुष्यात येणाऱ्या अडचणी पार कराल, स्व:तावर विश्वास ठेवा, फिट इंडिया आणि खेलो इंडिया अभियानाशी जोडले जावे व योगासनांना आपल्या जीवनात महत्वाचे स्थान द्या, असा संदेश दिला.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, शासन आणि महिला व बाल विकास विभाग आपल्या सोबत आहे. सुजान नागरिक बनण्यासाठी शिक्षणाची कास धरा, चांगला अभ्यास करा आणि उत्तम भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

            कार्यक्रमामध्ये कोरोना महामारीने आपले आई-वडील गमावलेल्या मुलांना पीएम केअर फॉर चिल्ड्रन स्कीम निधीमधून दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांच्या वयानुसार आर्थिक मदत केली जाणार आहे. या शिवाय आयुष्यमान भारत योजने अंतर्गत 5 लाख रुपयांचा प्रतीवर्षी आरोग्य विमा दिला जाणार आहे. त्याचा प्रिमियम देखील पीएम केअर फंडामधून दिला जाणार आहे. तसेच प्रधानमंत्री यांचे आलेले स्नेह पत्र संबंधित  बालकांना त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी बालकांसोबत संवाद साधला.

            या कार्यक्रमासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे, बाल न्याय मंडळ सदस्या ॲड. सत्यशिला तांगडे व वर्षा कुरील, बाल कल्याण समिती सदस्या ॲड. जया करडेकर, परिविक्षा अधिकारी सुनिल वाठोरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, माहिती अधिकारी कार्यालयाचे माहिती सहाय्यक चंद्रकांत कारभारी, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, क्षेत्र कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत तसेच प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            या कार्यक्रमासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन (1098) चे सदस्य व बालक आणि त्यांचे पालक वेब कास्ट व्दारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी NIC विभाग आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षा मार्फत नियोजन करण्यात आले.       

******

No comments: