16 May, 2022

 

स्व.राजीव सातव यांच्या प्रथम स्मृतीदिनी पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडून अभिवादन

 

स्व. सातव यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल

- पालकमंत्री वर्षाताई गायकवाड




 

            हिंगोली (जिमाका), दि. 16 : स्व. खा. राजीव सातव यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य माणसाचे, कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा हिंगोलीच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केले.

पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी आज कळमनुरी येथील स्व. राजीव सातव यांच्या समाधीस्थळाला भेट देवून त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या, स्व. खा. सातव हे जनतेप्रती सेवाभाव, पक्षावरील निष्ठा, शांत आणि मनमिळावू स्वभाव या गुणांमुळे ते आम्हा सर्वांच्या हृदयामध्ये कायम आहेत. स्व. सातव हे राजकारणातील रत्नपारखी कार्यकर्ते आणि जनसेवेसाठी जीवन वाहिलेले मार्गदर्शक आणि आदर्श राजीवभाऊ सातव यांनी नेत्याने कसे वागावे, बोलावे आणि मितभाषी असूनही ठाम भूमिका कशी मांडावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजीवभाऊ आहेत. जनतेची सर्व कामे करण्याचा प्रयत्न करायला हवा, असं म्हणत आपले जीवन जनसेवेला समर्पित करणारा आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून सतत राबणारा असा युवा नेता पुन्हा होणे नाही, या पुतळ्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा राहील, अशा भावना व्यक्त करुन श्रध्दांजली वाहिली.

तसेच स्व. सातव यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य माणसाचे, कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असून हीच खरी त्यांना श्रध्दांजली ठरणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकास कामे व जनतेचे प्रश्न सोडविण्यात येतील, असे सांगितले.

स्व. राजीव सातव यांच्या समाधी स्थळाचे व पुतळ्याचे अनावरण यावेळी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मूर्तिकार विजय बोंडर यांचा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी सत्कार केला.

यावेळी माजी मंत्री रजनीताई सातव, आ. डॉ. प्रज्ञा सातव, आ. तान्हाजी मुटकुळे, माजी आ. संतोष टारफे, सिध्दार्थ हत्तीअंबीरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्यासह राज्यातून आलेले विविध अधिकारी, पदाधिकारी यांनी स्व. सातव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी भेट देवून रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी परिसरातील व पंचक्रोशीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.  

*****

 

No comments: