25 May, 2022

 

उद्योजकतेला चालना देण्यासाठी उद्यमिता यात्रा 1 जून रोजी हिंगोली जिल्ह्यात

युवक-युवती व नवउद्योजकांनी सहभागी व्हावे-डॉ.रा.म.कोल्हे

 

            हिंगोली (जिमाका), दि. 25 : राज्यात लघु व सुक्ष्म व्यवसाय, कौशल्य विकास आणि तरुणांमधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्यव्यापी उद्यमिता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविण्यता मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला आहे.

            ही यात्रा 1 जून, 2022 रोजी हिंगोली येथे येणार आहे. दि. 1 ते 3 जून दरम्यान युवक-युवती व नवउद्योजकांना विनामूल्य उद्योजकता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे तीन दिवशीय मोफत उद्योजकता प्रशिक्षण सामाजिक न्याय भवन, जिल्हा रुग्णालयाच्या बाजूला, हिंगोली येथे आयोजित करण्यात आले आहे. यासाठी https://forms.gle/or8bgAHJQZDvF25V6 या गुगल फॉर्मवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

            या प्रशिक्षणामध्ये तज्ञ प्रशिक्षक सहभागी व्यक्तींना मार्गदर्शन करतील. यामध्ये व्यवसायाचे नियोजन करणे, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची ओळख करुन त्यांच्याशी जोडून देणे, त्यासाठी लागणाऱ्या अटीची पूर्तता करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे, व्यवसायासाठी बाजारात संधी कशा प्रकारे शोधल्या पाहिजेत याबाबत माहिती देणे, जिल्हा उद्यमिता विभागाला त्यांना जोडून देणे अशा अनेक महत्वाच्या विषयावर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

            ही उद्यमिता यात्रा हिंगोली जिल्ह्यामध्ये दि. 1 जून रोजी येणार असून या यात्रेमध्ये जिल्ह्यातील नव उद्योजकांनी तसेच व्यवसाय करण्यास इच्छूक असणाऱ्या व्यक्तींनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा. नोंदणी करताना काही समस्या आल्यास युथ एड जिल्हा समन्वयक दत्तप्रसाद रहाटे मो.8766932413 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. रा. म. कोल्हे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.

****

No comments: