31 May, 2022

 

अमृत महोत्सवी फळझाड, वृक्ष व फूलपिक लागवड योजनेचा

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : भारत देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे. आपल्या देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. अशात महाराष्ट्र राज्याने राज्यातील दारिद्र्याच्या उच्चाटनासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडिक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड, वृक्ष व फूलपिक लागवड कार्यक्रम ठरवलेला आहे. पुढील 25 वर्ष दरवर्षी सरासरी एक लक्ष हेक्टर फळझाड, वृक्ष, फूलपिक लागवड होईल. जेणेकरुन स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा या योजनेंतर्गत एकूण 25 लक्ष हेक्टर लागवड झालेली असेल. तसेच या आणि अन्य माध्यमातून देशाच्या शताब्दी वर्षी राज्याला अधिकाधिक शेतकऱ्यांना लक्षाधीश करण्यात यश येईल.

महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम-1977 मधील अनुसुची दोन मधील परिच्छेद 4 नमूद करण्यात आल्याप्रमाणे तसेच दि.30 मार्च, 2022 च्या शासन निर्णयामधील प्रवर्गातील प्राधान्यक्रमानुसार वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग  शेतावर, शेताच्या बांधावर व पडिक जमिनीवर फळझाड व फूलपिक लागवड कार्यक्रम ग्राम पंचायती तसेच कृषी व फलोत्पादन विभागामार्फत आणि वृक्ष लागवड कार्यक्रम वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत हाती घेण्यास शासनाने मान्यता दिलेली असून मग्रारोहयोसाठी जॉबकार्ड धारक शासन निर्णयातील नमूद प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तिक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.

तसेच या योजनेतंर्गत फळझाड, वृक्ष, फूलपिक लागवडीसाठी कमीत कमी 0.05 हेक्टर व जास्तीत जास्त 2.0 हेक्टर प्रती लाभार्थी क्षेत्र मर्यादा राहील. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज करता येईल. त्याबाबतची सोय ग्रामपंचायतीकडे करण्यात आलेली आहे. तसेच याबाबतच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. त्यांनी शासनाने दिलेल्या http://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScFOuLLqOzrDvIHLjZE_WSRFIR98G3ypbrZrSISveTUZAFug/viewform?usp=link या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. नियोजन विभाग (रोहयो) यांच्याकडील दि.30 मार्च, 2022 च्या शासन निर्णयामधील योजनेंतर्गत एकूण 79 समाविष्ठ फळपिके, वृक्ष व फूलपिकांची शेतामध्ये लागवड करता येईल. तसेच लाभार्थी किती क्षेत्रावर, कोणत्या फळझाडांची, फुलपिकांची लागवड तसेच कोणत्या प्रकारात करावयाची आहे. त्याप्रमाणे शासन मान्यतेने मंजूर केलेल्या मापदंडानुसार अंदाजपत्रकानिहाय प्रती हेक्टरी झाडांच्या, फळबागांच्या संख्येनुसार तसेच तीन वर्षाच्या कालावधीतील झाडांच्या जिवंत टक्केवारीनुसार मग्रारोहयो अंतर्गत कुशल, अकुशल घटकानुसार 5 ते 8 लाख या दरम्यान अनुदान प्राप्त होईल.

मे अखेर सर्व पात्र शेतकऱ्यांना त्यांनी सादर केलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास जून 2022 मध्ये फळबाग लागवडीची सुरुवात करता येईल. यासाठी प्रशासन शक्यतो सर्व मदत करण्यास तयार आहे. तसेच गावातील ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक यांच्यामार्फत ग्रामपंचायती अंतर्गत फॉर्म भरण्याची सुविधा देण्यात येईल.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, रोहयो विभागाचे उपजिल्हाधिकारी कमलाकर फड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे.

*****

No comments: