11 May, 2022

 

जिल्ह्यातील नव उद्योजकांनी उद्यमिता यात्रेमध्ये सहभागी व्हावे

 

            हिंगोली (जिमाका), दि. 11 : जगावर ओढवलेला कोरोना महामारीचा फटका भारताला पण बसला. याचा विपरीत परिणाम ग्रामीण तसेच शहरी अर्थव्यवस्थेवर झाला आहे. अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या, लघु आणि मध्यम व्यवसाय बंद झाले. आता कोरोना ओसरत असल्याने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने राज्यातले लघु व्यवसाय सुरु करण्यास इच्छुक असणाऱ्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्याचे काम हाती घेतले आहे.

            या अनुषंगाने युथ एड फाऊंडेशनने महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून उद्यमिता यात्रेचे आयोजन केले आहे. ही उद्यमिता यात्रा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये जाऊन महिला, युवकांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देत आवश्यक ते मार्गदर्शन करणार आहे. दि. 10 मे रोजी मुंबईतून या यात्रेची सुरुवात झाली आहे. प्रत्येक दिवशी ही यात्रा एका जिल्ह्याला भेट देणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात युथ एड फाऊंडेशन तीन दिवशीय प्रशिक्षण शिबीर घेणार आहे. यामध्ये तज्ञ प्रशिक्षक सहभागी व्यक्तींना मार्गदर्शन करतील. यामध्ये व्यवसायाचे नियोजन करणे, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची ओळख करुन त्यांच्याशी जोडून देणे, त्यासाठी लागणाऱ्या अटीची पूर्तता करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे, आर्थिक तसेच डिजिटल साक्षर करणे, त्या-त्या भागाच्या अनुषंगाने व्यवसायाचे पर्याय सुचविणे, व्यवसायासाठी बाजारात संधी कशाप्रकारे शोधल्या पाहिजेत याबाबत माहिती देणे, जिल्हा उद्यमिता विभागाला त्यांना जोडून देणे अशा अनेक महत्वाच्या विषयासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे.

            ही उद्यमिता यात्रा हिंगोली जिल्ह्यामध्ये दि. 01 जून, 2022 रोजी येणार आहे. या यात्रेमध्ये जिल्ह्यातील नव उद्योजकांनी तसेच व्यवसाय करण्यास इच्छूक असणाऱ्या व्यक्तींनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ. रा. म. कोल्हे, सहायक आयुक्त , कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: