09 January, 2017

वाहतूक नियमांचे पालन करीत शिस्तबध्द वाहने चालवावी
                                                        -- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
·         रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन
हिंगोली, दि.9: रस्ता सुरक्षा अत्यंत महत्वाची गरज असून त्याकरीता समाजात जनजागृती होऊन सामाजिक मानसिकता निर्माण होणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे पालन करीत शिस्तबध्द वाहने चालवल्यास विविध अपघातात प्राणहानी टाळता येते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.
            वाहतुक शाखा, हिंगोली येथील प्रांगणात 28 वे रस्ता सुरक्षा अभियान 2017 चे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक अशोक मोराळे, मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, कार्यकारी अभियंता एस. जी. देशपांडे, हिंगोली शहरचे पोलीस उपअधिक्षक एच. डी. भोरे यांची उपस्थिती होती.
            यावेळी श्री. भंडारी म्हणाले की, अपघातामुळे अपघातग्रस्त कुंटूबाचे नुकसान तर होतेच त्याशिवाय राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3 टक्के इतकी देशाची आर्थिक हानी होते. जर सुरक्षा केली असती तर विविध अपघातात प्राणहानी टाळता आली असती असेही अपघातानंतर लक्षात येते. परंतू एकदा गेलेली वेळ परत येत नाही. अशा झालेल्या सर्व अपघातांची कारणे व त्या संदर्भातील सुस्पष्ट आकडेवारी जनतेसमोर येणे आवश्यक आहे. कारण यामुळे जनजागृती होण्यास मदत होणार आहे. दर वर्षी नवीन वाहनांची संख्या दहा टक्क्यांनी वाढत असली तरी होणाऱ्या अपघाताची टक्केवारी कमी आहे. वाहतूक नियमांचे पालन करुन आपल्या जीवनाचे रक्षण करावे. कारण यामुळेच आपले आणि दुसऱ्यांचे जीवाचे रक्षण होऊन अपघात कमी होण्यास मदत होईल. रस्ता सुरक्षेबाबतची ही मोहिम शाळा, महाविद्यालये, कारखाने, विविध ठिकाणी राबविण्यात येत असून यामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन ही श्री. भंडारी यांनी यावेळी केले.
            यावेळी पोलीस अधिक्षक अशोक मोराळे श्री. तुम्मोड आणि  श्री. देशपांडे यांनी देखील उपस्थित वाहन चालक, मालक व विद्यार्थी यांना रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन केले.
            यावेळी जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाहन चालकांना हेल्मेटचे वितरण करण्यात आले. तसेच वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. तसेच  रस्ता सुरक्षा विषयक तसेच शालेय बस नियमावली पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
            प्रारंभी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हणाले की, यावर्षी Your Sefety, Secures Your Family Please Be Cautious on Road हे शासनाने ब्रिदवाक्य घोषित केल असून, रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती देवून वाहनचालक, मालक व विद्यार्थी यांना रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन केले.
            सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक नितीन जाधव, अशोक जाधव, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक डी. एस. साळुंके, व्ही. डी. राऊत, किशोर पवार तसेच कर्मचारी व पोलीस विभागाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले. वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आर. डी. कायंदे यांनी आभार व्यक्त केले.

                                                                        *****




No comments: