29 March, 2024

निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांची माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती कक्षाला भेट

हिंगोली, दि.29 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयात स्थापन जिल्हा माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती कक्षाला भेट देत पाहणी केली. हिंगोली लोकसभा मतदार संघातील 92-वसमत, 93-कळमनुरी आणि 94-हिंगोली या तीन विधानसभा मतदारसंघाचे ते निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून काम पाहणार आहेत. उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा निवडणूक खर्च समितीचे पथक प्रमुख तथा जिल्हा कोषागार अधिकारी माधव झुंजारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगांबर माडे, श्री. अली यांचे संपर्क अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, माध्यम कक्षातील श्रीमती आशा बंडगर, कैलास लांडगे, परमेश्वर सुडे आदी यावेळी उपस्थित होते. माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडे येणारे राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण, वृत्तवाहिन्यांवरील जाहिरातींचे संनियंत्रण, पेड न्यूजवर लक्ष ठेवणे, निवडणूक आचारसंहिता कालावधीत माध्यमांमध्ये येणारे वृत्त वाचन करून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या ते निदर्शनास आणून देणे, पेड न्यूजचे अहवाल, माध्यमांना निवडणुकीसंदर्भातील माहिती वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश निवडणूक‍ निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांनी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीला दिले. यावेळी प्रसारमाध्यमांना निवडणूकविषयक विविध आढावा बैठकांचे वृत्त, पत्रकार परिषदांचे आयोजन, वृत्तपत्रांतील वृत्ताचे संकलन करून त्यावर आवश्यक कार्यवाही करणे, निवडणूकविषयक बातम्यांबाबत अहवाल तयार करून तो भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे याबाबतची माहिती पथकप्रमुख तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते यांनी निवडणूक निरीक्षकांना दिली. ******

No comments: