27 March, 2024

लोकसभा निवडणूक : नामनिर्देशन पत्रासोबत ना-देय प्रमाणपत्र आवश्यक

हिंगोली (जिमाका), दि. 27 : लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरताना उमेदवारांना निवडणूक आयोगामार्फत विविध सूचना देण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने मागील दहा वर्षाच्या कालावधीत कोणत्याही वेळी शासकीय निवासस्थानाचा ताबा घेतला असल्यास त्याच्या वापराचे संबंधीत विभागाचे भाडे, विद्युत आकार, पाणीपट्टी व दूरध्वनी आदी देयके भरुन सक्षम प्राधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे ना-देय प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. स्वतंत्र बँक खाते नव्याने उघडणे बंधनकारक : उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी स्वतंत्र बँक खाते नव्याने उघडावे. हे खाते उमेदवाराला स्वत:चे नावे किंवा निवडणूक प्रतिनिधीसोबत संयुक्तरित्या काढता येईल. सदर बँक खाते नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या किमान एक दिवस अगोदर उघडलेले असणे आवश्यक असून यात केवळ निवडणुकीशी संबंधीतच व्यवहार करायचे आहेत. नामनिर्देशन दाखल करताना शंभर मीटरच्या आत 5 पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेशास निर्बंध : नामनिर्देशन दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात उमेदवार व इतर 4 अशा एकूण पाच व्यक्तींनाच प्रवेश करता येणार आहे. तसेच पाचपेक्षा जास्त व्यक्तींना शंभर मीटरच्या आत प्रवेश मिळणार नाही. मान्यताप्राप्त पक्षांना ए व बी फॉर्म दाखल करणे बंधनकारक : मान्यताप्राप्त राजकीय पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने पक्षाचे विहित नमुन्यातील ए व बी फॉर्म नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिनांकास दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करणे बंधनकारक आहे. अपक्ष उमेदवारांना 10 प्रस्तावक आवश्यक : उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करताना याच लोकसभा मतदार संघातील प्रस्तावक असणे बंधनकारक आहे. मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवारांना एक मतदार प्रस्तावक तर अपक्ष आणि इतर राज्यातील मान्यताप्राप्त अथवा नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवारांना 10 मतदार प्रस्तावक असावे. उमेदवार जर इतर जिल्ह्यातील अथवा मतदार संघातील असेल तर त्याने नामनिर्देशन पत्रासोबत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. नामनिर्देशनासाठी गर्दी झाल्यास जे उमेदवार नामनिर्देशन पत्र व आवश्यक त्या कागदपत्रांसह उमेदवारीसाठी नामनिर्देशन भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात हजर असतील त्यांचाच विचार केला जाईल. दुपारी 3 वाजल्यानंतर बाहेरुन कोणतीही कागदपत्रे आणता येणार नाहीत अथवा अन्य कोणाही व्यक्तीस ती देण्यासाठी प्रवेश देता येणार नाही. नामनिर्देशनपत्र व्यक्तीश: उमेदवारांनी अथवा सूचकाने सादर करणे आवश्यक आहे. उमेदवाराने दोन पेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघामध्ये नामनिर्देशनपत्र दाखल करू नये. ही जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. शपथपत्र व दृढकथन उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल करत असताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर मोठ्या आवाजात घेणे आवश्यक आहे. तसे केल्यानंतर साक्षांकित करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी त्यांच्या ओळखपत्रासाठी दोन पासपोर्ट साईज रंगीत फोटो नावाची नोंद असलेल्या पाकीटात देणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्राच्या छाननीच्या वेळी उमेदवार, उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी, एक सूचक व एक प्राधिकृत प्रतिनिधी असे एकूण पाच व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. नामनिर्देशनासाठी उमेदवाराचे वय 25 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या निवडणूक खर्चाची मर्यादा 95 लक्ष इतकी आहे. उमेदवाराने बँक अकाऊंट, मोबाईल क्रमांक, ई-मेल व पूर्ण पत्ता असलेले निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडील दिलेले पत्र भरुन सादर करणे आवश्यक आहे. 15-हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत 25 हजार रुपये अनामत रक्कमत भरून त्याची पावती नामनिर्देशनासोबत जोडणे आवश्यक आहे. उमेदवार जर अनुसूचित जाती, जमाती असेल तर त्याने नामनिर्देशन पत्रात उल्लेख करून साक्षांकित करणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती व जमाती उमेदवारासाठी अनामत रक्कम 12 हजार 500 रोखीने किंवा चलनाने भरणा करणे, शपथपत्रातील सर्व रकाने स्पष्ट शब्दात पूर्णपणे भरणे, सक्षम प्राधिकाऱ्यासमोर शपथ घेतल्याबाबतचे शपथपत्र सादर करणे, आदी काही सूचना सोबतच भारत निवडणूक आयोगाने नामनिर्देशनाबाबत निर्गमित केलेल्या सविस्तर सूचनांचे अवलोकन उमेदवारांनी करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. *****

No comments: