07 March, 2024

नेहरु युवा केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय युवा पडोस संसद कार्यक्रम संपन्न

हिंगोली (जिमाका), दि 07 : नेहरु युवा केंद्र, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने 'मेरा युवा भारत - विकसित भारत' या थीमवर आधारित जिल्हास्तरीय युवा पडोस संसद कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पूजन व दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी नेहरु युवा केंद्रांचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, कौशल्य विकास उद्योजकता केंद्राचे वरिष्ठ सल्लागार डॉ. रिता पाटील, वरिष्ठ पत्रकार व समाजभूषण पुरस्कारार्थी डॉ.विजय निलावार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक मलिकार्जून करजगी, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य देवसरकर, युनिसेफचे प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे अधिव्याख्याता अरुण दमकोंडवार, सामाजिक कार्यकर्ता व इतिहास विषयाचे लिखाण तज्ञ विशाल मुळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांनी युवकांना चालना देण्यासाठी तसेच या संसद कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांचे नेतृत्व गुण, कौशल्य विकसित करण्यासाठी नेहरु युवा केंद्र काम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण जिल्हास्तरीय पडोस युवा संसद हा कार्यक्रम घेत असल्याचे सांगितले. स्वारातीम विद्यापीठ नांदेड राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक मलिकार्जून करजगी यांनी आपल्या मनोगतात जिल्हास्तरीय युवा पडोस संसद कार्यक्रम हा एक युवकांना चालना आणि त्यांच्यामध्ये असणारे नेतृत्व विकसित करण्याचे काम होणार आहे. येणारा काळ हा निवडणुकीचा असल्यामुळे सर्व युवकांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी. आपण सर्वांनी आपलं नाव मतदार यादी मध्ये नोंदवून देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे. त्याचबरोबर त्यांनी शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जलव्यवस्थापन, झाडे लावा, झाडे जगवा याची जनजागृती करुन कार्य केले पाहिजे, असे सांगितले. डॉ.विजय निलावार यांनी आपण सर्वांनी नेहरु युवा केंद्राच्या विविध कार्यक्रमासोबत जोडून राहिले पाहिजेत. यामुळे आपण सामजिक कार्यामध्ये जोडून राहणार असल्याचे सांगितले. युनिसेफ प्रकल्प समन्वयक सुश्री मोनाली धूर्वे यांनी राज्यात आणि जिल्ह्यात वाढते बालविवाहाचे प्रमाण हे चिंताजनक आहे.त्यामुळे आपण सर्व युवकांनी यामध्ये पुढाकार घेऊन ज्या ठिकाणी बाल विवाह होत आहेत, त्या ठिकाणी आपण एक देशाचे सुजाण नागरिक म्हणून ते थांबवले पाहिजे, असे सांगितले. विशाल मुळे यांनी नारीशक्ती या विषयावर बोलत असताना नारी देशाची एक आधारस्तंभ आहे. त्यामुळे आपण सर्वांनी नारीचा सन्मान हा देशाचा सन्मान या भावनेने आपण सर्वांनी आदर केला पाहिजे. त्याचबरोबर मुलींनी जिजामाता, संत मीराबाई, झाशी की राणी या वीर नारीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य केले पाहिजे, असे सांगितले. कौशल्य विकास उद्योजकता केंद्राच्या वरिष्ठ सल्लागार डॉ.रिता पाटील यांनी लोकॅल फॉर होकल या विषयावर बोलताना आपण सर्वांनी आपल्या लोकल वस्तूला चालना दिली पाहिजे. युवकांनी लोकल ज्या काही वस्तू आहेत त्या घेतल्या पाहिजे, असे सांगितले. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व युवकांनी सहभाग घेऊन यशस्वीरित्या आभासी ससंद पार पडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहरु युवा केंद्राचे प्रविण पांडे यांनी केले. शेवटी आभार नेहरु युवा केंद्रांचे अनिल ढेंगे यांनी केले. ********

No comments: