08 March, 2024

हिंगोली येथे होणाऱ्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

• मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत रामलीला मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन • जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी आपणास दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हिंगोली (जिमाका), दि 08 : राज्य शासनाच्या सर्व योजना लोकाभिमुख करुन त्यांची योग्य अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोली येथील रामलीला मैदानावर रविवार दि.10 मार्च रोजी ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार विप्लव बाजोरिया, आमदार प्रज्ञा सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार चंद्रकांत ऊर्फ राजू नवघरे, आमदार संतोष बांगर, विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. राज्य शासनाच्या या लोकाभिमुख कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून आपणास दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज सर्व विभागप्रमुखांना दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, डॉ. सचिन खल्लाळ, श्रीमती क्रांती डोंबे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांच्यासह जिल्ह्यातील विकास यंत्रणेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयाचे विविध दस्तावेज, कागदपत्रे उपलब्ध करुन देणारे अधिकारी व कर्मचारी यांना एकाच छताखाली आणून विविध योजनांचे लाभ देण्यात येणार आहेत. या उपक्रमातून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना एकाच छताखाली सर्व शासकीय यंत्रणा आणून त्यांना लाभ देण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिली आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी बैठकांद्वारे पूर्वतयारी आढावा घेण्यात आला आहे. तसेच या कार्यक्रमात विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही स्थानिक पातळीवर करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील लाभार्थ्यांना निमंत्रण देण्यात येणार असून, कार्यक्रमस्थळी राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारी दालने उभारण्यात येणार आहेत. यात महसूल, जिल्हा परिषद, पोलीस, कृषी, समाज कल्याण, आरोग्य विभाग आदीसह महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांचेही दालन असे 30 दालने असणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. जिल्ह्यात शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 01 लाख 49 हजार 437 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आलेला आहे. दि. 10 मार्च रोजी होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी 300 एसटी बसेस, आरटीओ मार्फत भाडे तत्वावर 400 प्रवासी वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषद मैदान, एसटी बसस्थानक परिसर, कृषि कार्यालयाशेजारी वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. वरील सर्व कामाची जबाबदारी विविध अधिकाऱ्यांना नेमून दिलेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. ******

No comments: