09 March, 2024

हिंगोली येथे आज 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे भव्य आयोजन

• मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत रामलीला मैदानावर कार्यक्रम • जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी हिंगोली (जिमाका), दि 09 : राज्य शासनाच्या सर्व योजना लोकाभिमुख करुन त्यांची योग्य अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोली येथील रामलीला मैदानावर उद्या रविवार दि.10 मार्च रोजी दुपारी 3 वाजता ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, खासदार हेमंत पाटील, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार विप्लव बाजोरिया, आमदार प्रज्ञा सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार चंद्रकांत ऊर्फ राजू नवघरे, आमदार संतोष बांगर, विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. राज्य शासनाच्या या लोकाभिमुख कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून आपणास दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज सर्व विभागप्रमुखांना दिले. रामलीला मैदानावर आज शासन आपल्या दारीचे मुख्यमंत्री कार्यालयाचे नोडल अधिकारी विकास औटे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यासह प्रशासकीय यंत्रणेच्या सर्व विभाग प्रमुखांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्री. औटे यांनी यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्ह्यात शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत दि. 10 मार्च रोजी होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी 300 एसटी बसेस, आरटीओ मार्फत भाडे तत्वावर 400 प्रवासी वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषद मैदान, एसटी बसस्थानक परिसर, स्व. राजीव सातव नाट्यगृह परिसर, कृषि कार्यालयाशेजारी वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. वरील सर्व कामाची जबाबदारी विविध अधिकाऱ्यांना नेमून दिलेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. ******

No comments: